क्रिकेट, हॉकी, बॉक्सिंग पाठोपाठ बॅडमिंटनपटूंनाही मालामाल होण्याची संधी मिळणार आहे. ही संधी देणाऱ्या भारतीय बॅडमिंटन लीगचे शनिवारी उद्घाटन झाले. स्पोर्टी सोल्युशन्स आणि भारतीय बॅडमिंटन लीग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा पुढच्या वर्षी २४ जून ते ११ जुलै या कालावधीत होणार आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष डॉ. अखिलेश दासगुप्ता, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गंधे यांच्यासह लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती भारताची फुलराणी सायना नेहवालसह पारुपल्ली कश्यप, ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा, पी.व्ही.सिंधू उपस्थित होते.
साडेपाच कोटी रुपये बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेत सहा शहरांचे संघ (फ्रँचाइज) असणार आहेत. दिल्ली, लखनौ, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, बंगळरू, हैदराबाद या आठ शहरांतून सहा शहरांची प्रत्यक्ष स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. प्रत्येक संघासाठी साडेतीन संघांसाठी बेस रक्कम असणार आहे. केवळ भारतीय खेळाडूंनाच आयकॉन खेळाडूंचा दर्जा मिळणार आहे.
सुदीरमान चषकाच्या पद्धतीप्रमाणे पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा पाच प्रकारांमध्ये लढती होणार आहेत. प्रत्येक संघाला चार विदेशी खेळाडू निवडण्याची संधी मिळणार असून, सर्वोत्तम पाच (बेस्ट ऑफ फाइव्ह) लढतीत दोन विदेशी खेळू शकतात.
प्रत्येक फ्रँचाइजीच्या शहरात २ दिवस लढती होतील, यामध्ये सर्व संघांचा सहभाग असेल. १८ दिवसीय या स्पर्धेत २५ प्राथमिक लढती, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे स्वरूप असणार आहे. विजेत्या संघाला साडेतीन कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. प्रत्येक फ्रँचाइजीशी पाच वर्षांचा तर खेळाडूशी दोन वर्षांचा करार करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेने या लीगला तत्त्वत: मान्यता दिली असून, या लीगच्या काळात सुपर सीरिज किंवा ग्रां.प्रि. स्वरुपाची कोणताही स्पर्धा आयोजित केली जाणार नाही, जेणेकरून खेळाडूंचे नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आल्याचे प्रदीप गंधे यांनी सांगितले. मलेशिया, इंडोनेशिया, चीनचे खेळाडूंना स्पर्धेत खेळण्यासाठी प्रयत्न सुरू असून मलेशियाच्या खेळाडूंशी बोलणी अंतिम स्वरूपात असल्याचे स्पोर्टी सोल्युशन्सचे आशीष चढ्ढा यांनी सांगितले.     

चीनचे खेळाडू येणार?
इंडियन बॅडमिंटन लीगच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल बॅडमिंटनपटूंचा खेळ पाहण्याची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे. मात्र या स्पर्धेत चीनचे खेळाडू येणार का, याविषयी संदिग्धता आहे. चीनचे खेळाडू आपला खेळ, सराव, डावपेच याविषयी आत्यंतिक गोपनीयता बाळगतात. या लीगमध्ये खेळण्यास होकार दिल्यास त्यांचे डावपेच आणि खेळाची पद्धत भारतीयांसह अन्य देशांतील खेळाडूंना कळू शकते. अशा परिस्थितीत या लीगच्या माध्यमातून मिळणाऱ्या घसघशीत रकमेसाठी ते गोपनीयतेची चौकट मोडणार का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चीनच्या बॅडमिंटन संघटनेशी बोलणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविण्यात आल्याची माहिती स्पोर्टी सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चढ्ढा यांनी सांगितले.

भारतीय बॅडमिंटनसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. लंडन ऑलिम्पिकनंतर देशभरात बॅडमिंटनला विशेष प्रेम लाभले आहे. इंडियन बॅडमिंटन लीगमुळे बॅडमिंटनची व्याप्ती वाढीस लागेल. ऑलिम्पिकनंतर आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, त्या पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.
-सायना नेहवाल
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू

Story img Loader