जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्यी ली चोंग वेईने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर के. श्रीकांतवर विजय मिळवून मुंबई मास्टर्सला अवध वॉरियर्सविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधून दिली. मात्र पाचवा आणि निर्णायक सामना जिंकून अवधने मुंबईवर ३-२ अशी सरशी साधली. त्याआधी अवधची पी. व्ही. सिंधू आणि मुंबईचा व्लादिमिर इव्हानोव्ह यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत विजय मिळवले होते.
पहिल्या लढतीत मुंबईच्या व्लादिमीरने वॉरियर्सच्या आरएमव्ही गुरुसाईदत्तवर २१-१८, २०-२१, ११-९ अशी मात केली. दुसऱ्या लढतीत सिंधूने अनुभवी टिने बाऊनला २१-१२, १९-२१, ११-८ असे नमवले. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सिंधूने प्रदीर्घ रॅली, नेटजवळून सुरेख खेळ तसेच ड्रॉप आणि क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख उपयोग करत हा मुकाबला जिंकला. पुरुष दुहेरीच्या लढतीत अवध वॉरियर्सच्या मार्किस किडो आणि मॅथिअस बोए जोडीने मुंबई मास्टर्सच्या मनू अत्री आणि सुमीत रेड्डीवर २१-१६, २१-१४ असा सहज विजय मिळवला.
ली चोंग वेईने श्रीकांतवर २१-१५, २०-२१, ११-५ असा विजय मिळवला मात्र विजयासाठी त्याला जबरदस्त संघर्ष करावा लागला. पहिला गेम ली चोंग वेईने जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्ये अनुभवाच्या जोरावर लीने श्रीकांतला चुका करण्यास भाग पाडले आणि हा मुकाबला जिंकला. मिश्र दुहेरीच्या पाचव्या सामन्यात मार्किस किडो-पिया बर्नाडेथ यांनी मुंबईच्या इव्हानोव्ह-एन. सिक्की रेड्डी यांनी २१-१९, २१-१५ असे हरवत अवधला विजय मिळवून दिला.

Story img Loader