क्रिकेटच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटिल-मास्टर सुनील गावस्कर या दिग्गज रथी-महारथींच्या साक्षीने बॅडमिंटनमधील महारथी ली चोंग वेईने दमदार स्मॅशेसची बरसात करत मुंबईच ‘मास्टर्स’ असल्याचे दाखवून दिले. मुंबई मास्टर्सने दिल्ली स्मॅशर्सचा ४-१ असा पराभव करत घरच्या मैदानावरील सलग दुसरी लढत सहजपणे जिंकली.
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ली चोंग वुई पहिल्यांदाच कोर्टवर अवतरणार असल्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांनी वरळीच्या एनएससीआय स्टेडियमवर तोबा गर्दी केली होती. चोंग वुईने एकापेक्षा भन्नाट फटके भात्यातून काढत स्मॅशेस, क्रॉसकोर्ट्स व ड्रॉपशॉट्सचा अभूतपूर्व नजराणा पेश करत अपेक्षेप्रमाणे मलेशियाच्या डॅरेन लिऊवर वर्चस्व गाजवले. कोर्टवर सहजपणे वावरणाऱ्या चोंग वुईने डॅरेन लिऊचा २१-१२, २१-१६ असा सहज पाडाव करत मुंबईला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
तीन वेळा अखिल इंग्लंड विजेती ठरलेल्या टिने बाऊनसमोर दिल्लीच्या अरुंधती पानतावणेचे आव्हान म्हणजे मुंबईसाठी विजयाचा बोनस गुणच होता. गेल्या दोन सामन्यात पराभूत झालेल्या टिने बाऊनने यावेळी कोणतीही चूक न करता पानतावणेचे आव्हान २१-११, २१-१३ असे ३१ मिनिटांत सहज परतवून लावत मुंबईची आघाडी आणखी मजबूत केली. मात्र पुरुष दुहेरीत कू किएन किएट-टॅन बून होएंग यांनी मुंबईच्या बी. सुमीत रेड्डी-मनू अत्री जोडीवर १४-२१, २१-१५, ११-७ असा विजय मिळवून दिल्लीचे आव्हान जिवंत ठेवले. दिल्लीला बरोबरी साधून देण्यासाठी साईप्रणीथने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुंबईच्या मार्क वेबलरसमोर त्यांची झुंज १८-२१, २१-१८, ११-९ अशी अपयशी ठरली. मिश्र दुहेरीत वेई आणि बाऊन जोडीने अखेरच्या लढतीत दिल्लीच्या व्ही. दिजू  व प्राजक्ता सांवत जोडीवर १८-२१, २१-१५, ११-५ अशी मात केली.

Story img Loader