भारतात प्रथमच होणाऱ्या भारतीय बॅडमिंटन लीगकरिता (आयबीएल) १९ जुलै रोजी येथे खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये दीडशेपेक्षा अधिक खेळाडूंकरिता बोली लावली जाईल असा अंदाज आहे. ही स्पर्धा सहा फ्रँचाईजीमध्ये होणार आहे. प्रत्येक संघात चार परदेशी, १९ वर्षांखालील एक खेळाडूंचा समावेश अनिवार्य आहे. सायना नेहवाल, पारुपली कश्यप, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, पी.व्ही.सिंधू या पाच खेळाडूंकरिता किमान ५० हजार डॉलर्सची बोली लावावी लागणार आहे. त्याखेरीज एका परदेशी खेळाडूकरिताही तेवढाच किमान भाव ठेवण्यात आला आहे. प्रत्येक फ्रँचाईजीस सहा खेळाडूंवर जास्तीत जास्त दीड कोटी रुपयांचा खर्च करता येईल. सर्वाधिक बोली मिळविणाऱ्या खेळाडूस दहा टक्के जास्त रक्कम दिली जाईल.
या स्पर्धेत सतरा देशांच्या नामवंत खेळाडूंबरोबरच भारतामधील बहुतांश सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना पाच जुलैपूर्वी आपला सहभाग निश्चित करावयाचा आहे.
स्पर्धेतील सामने अव्वल साखळी पद्धतीने होणार असून पहिले चार क्रमांक मिळविणारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम लढत ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजित केली जाणार आहे. खेळाडूंच्या लिलावाकरिता लंडन येथील ख्यातनाम लिलावतज्ज्ञ बॉब हेटन यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Story img Loader