इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटनाच्या लढतीतच थरारक खेळाची अनुभूती चाहत्यांनी घेतली. एकापेक्षा सरस फटक्यांची आतषबाजी पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. पहिला आणि तिसरा सामना जिंकून क्रिश दिल्ली स्मॅशर्सने आघाडी घेतली. पण पुणे पिस्टन्सने तोडीस तोड प्रत्युत्तर देत २-२ अशी बरोबरी साधली. निर्णायक पाचव्या सामन्यात तिसऱ्या गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत अखेर अश्विनी पोनप्पा-जोकिम फिशर नील्सन यांनी दिल्लीच्या ज्वाला गट्टा-किएन किएट कू यांच्यावर १९-२१, २१-१६, ११-३ अशी मात करत पुणे पिस्टन्सला ३-२ अशी विजयी सलामी मिळवून दिली.
पहिल्या फेरीत बी. साईप्रणीथने पुण्याच्या टिन मिन्ह युगेनवर सरळ गेममध्ये मात करून दिल्लीला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. गेल्या आठवडय़ात झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनच्या लिन डॅनकडून पराभूत होणाऱ्या युगेनला खेळात सातत्य राखता आले नाही. साईप्रणीथने २१-१६, २१-२० असा विजय मिळवून दिल्लीला १-० असे आघाडीवर आणले. दुसऱ्या सामन्यात जर्मनीची अव्वल खेळाडू ज्युलियन श्चेंकसमोर (पुणे) जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानी असलेल्या थायलंडच्या निचाओन जिन्डापोन हिचा निभाव लागला नाही. श्चेंक हिने ही लढत २१-१५, २१-६ अशी जिंकली.
पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात दिल्लीच्या बून होएंग टॅन-किएन किएट कू जोडीने पुण्याच्या रुपेश कुमार-सनावे थॉमस जोडीविरुद्ध पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये रुपेश-सनावे जोडीने कडवी लढत दिली. तरी बून-किएन जोडीने २१-१६ असा दुसरा गेम जिंकून दिल्ली स्मॅशर्सला २-१ असे आघाडीवर आणले. चौथ्या फेरीत पुण्याच्या सौरभ वर्माने शानदार खेळाचे प्रदर्शन करत एच. एस. प्रणयवर
२१-१६, १९-२१, ११-५ अशी मात केली.

Story img Loader