खचलेले मनोबल, स्विंग होणाऱ्या चेंडूंबाबत बाळगलेला न्यूनगंड आणि चुकांमधून न शिकण्याची वृत्ती या तिहेरी गोष्टी पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांसाठी मारक ठरल्या. त्यामुळे शुक्रवारी एकापाठोपाठ एक भारतीय फलंदाजांनी तंबूची वाट धरली. ओव्हलच्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भेदक आणि अचूक मारा करत त्यांनी भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवली. पण महेंद्रसिंग धोनीने मात्र एकाकी झुंज देत कर्णधाराला साजेशी खेळी साकारल्यामुळे भारताला पहिल्या डावात १४८ धावांपर्यंत तरी मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने संयमी फलंदाजी करत दिवसअखेर बिनबाद ६२ अशी मजल मारली होती. खेळ थांबला तेव्हा इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक आणि सॅम रॉबसन अनुक्रमे २४ आणि ३३ धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत पर्जन्यजन्य परिस्थितीचा फायदा उचलत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांचा हा निर्णय योग्य ठरल्याची काही वेळात प्रचिती आली. पहिल्याच षटकात भारताला गौतम गंभीरच्या रूपात पहिला धक्का बसला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मग अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीला या वेळी सदोष पंचगिरीचा फटका बसला. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू त्याच्या पॅडला लागला आणि पंच कुमार धर्मसेना यांनी त्याला बाद देत इंग्लंडला त्याचा बळी आंदण दिला.
महेंद्रसिंग धोनी वगळता एकाही भारताच्या फलंदाजाला इंग्लंडच्या गोलंदाजीचा प्रतिकार करता आला नाही. धोनीने १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८२ धावांची खेळी साकारत झुंजार फलंदाजीचे प्रदश्रन केले. पण त्याला अन्य फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताचा पहिला डाव १४८ धावांवर संपुष्टात आला. धोनीने अखेरच्या विकेटसाठी इशांत शर्मा (नाबाद ७) सोबत ५८ धावांची भागीदारी रचली.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी वातावरणाचा पुरेपूर फायदा उचलत शिस्तबद्ध मारा केला. तिखट माऱ्याच्या जोरावर त्यांनी भारतीय फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. ख्रिस जॉर्डन आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केले.
धावफलक
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. रूट, गो वोक्स १८, गौतम गंभीर झे. बटलर गो. अँडरसन ०, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. ब्रॉड ४, विराट कोहली पायचीत गो. जॉर्डन ६, अजिंक्य रहाणे झे. व गो. जॉर्डन ०, महेंद्रसिंग धोनी झे. वोक्स गो. ब्रॉड ८२, स्टुअर्ट बिन्नी झे. कुक गो. अँडरसन ५, आर. अश्विन झे. रूट गो. वोक्स १३, भुवनेश्वर कुमार झे. बटलर गो. जॉर्डन ५, वरूण आरोन झे. व गो. १, इशांत शर्मा नाबाद ७ अवांतर (बाइज ६, लेग बाइज १) ७, एकूण ६१.१ षटकांत सर्व बाद १४८.
बाद क्रम : १-३, २-१०, ३-२६, ४-२८, ५-३६, ६-४४, ७-६८, ८-७९, ९-९०, १०-१४८.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन १७-४-५१-२, स्टुअर्ट ब्रॉड १५.१-४-२७-२, ख्रिस जॉर्डन १४-७-३२-३, ख्रिस वोक्स १४-७-३०-३, मोइन अली १-०-१-०.
इंग्लंड (पहिला डाव) : अॅलिस्टर कुक खेळत आहे २४, सॅम रॉबसन खेळत आहे ३३, अवांतर (बाइज ४, वाइड १) ५, एकूण १९ षटकांत बिनबाद ६२.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-१-२५-०, इशांत शर्मा ७-२-१२-०, वरूण आरोन ३-०-१४-०, स्टुअर्ट बिन्नी २-०-७-०.
धोनी ८२ + अन्य फलंदाज ६६ = भारत १४८
खचलेले मनोबल, स्विंग होणाऱ्या चेंडूंबाबत बाळगलेला न्यूनगंड आणि चुकांमधून न शिकण्याची वृत्ती या तिहेरी गोष्टी पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांसाठी मारक ठरल्या.
First published on: 16-08-2014 at 02:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian batsmen crumble against england pacers at the oval