एकदिवसीय मालिकेत त्रेधातिरपीट उडाल्यानंतर भारतीय संघ बुधवारी वाँडर्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार असून दौऱ्यातील पराभवाचा दुष्काळ संपवण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल. सचिनविना भारतीय संघ पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळणार असून अनुभवाची कमतरता आणि वेगवान खेळपट्टय़ा यांच्यापुढे त्यांची खरी कसोटी असेल.
भारतीय संघातील सचिनची जागा कोण घेणार, याचे उत्तर या सामन्यात मिळणार असून चौथ्या क्रमांकावर विराट कोहली खेळायला येण्याची दाट शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडाली होती, त्यामधून सावरून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याचा सामना कसा करतो, हे साऱ्यांसाठी उत्सुकतेचे असेल. एकदिवसीय मालिकेत विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा यांची चांगलीच त्रेधा उडाली होती. त्यामुळे त्यांच्यासह अन्य फलंदाज कशी कामगिरी करतात, यावर भारताचा विजय अवलंबून असेल. अजिंक्य रहाणेला या सामन्यात संधी मिळू शकते. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टीवर भारताचे तारणहार ठरणार का, याकडेही साऱ्यांचे लक्ष असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या पुनरागमनाने संघाला संजीवनी मिळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. झहीरला मोहम्मद शामी, इशांत शर्मा यांची साथ लाभेल. आर. अश्विन हा एकमेव फिरकीपटू संघात असेल.
वाँडर्सवरील गेल्या सहा सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला असून या सामन्यातही ते विजयाची मालिका अविरत चालू ठेवण्याकडेच भर देतील. फलंदाजीमध्ये हशिम अमला आणि ए बी डी व्हिलियर्स यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. गोलंदाजीमध्ये डेल स्टेन आणि मार्ने मॉर्केल यांच्या वेगवान माऱ्यावर मुख्यत्वेकरून दक्षिण आफ्रिकेची  भिस्त असेल. अष्टपैलू जॅक कॅलिसकडून लौकिकाला साजेशा कामगिरीची अपेक्षा असेल.
खेळपट्टी कशी असेल
खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळेल, त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी पोषक असेल. पण एकदा स्थिरस्थावर झाल्यावर फलंदाजांसाठीही खेळपट्टी चांगली ठरू शकते. नाणेफेक जिंकल्यावर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारावी, असे ग्राउंड्समन पेथूइल बुथेलेझी यांनी सांगितले.

सचिन नसल्याचे सत्य स्वीकारून खेळ करावा लागेल -धोनी
जोहान्सबर्ग : सचिन तेंडुलकर यापुढे भारतीय संघाकडून खेळणार नाही, हे सत्य स्वीकारून भारतीय संघातील युवा खेळाडूंना वाटचाल करावी लागणार आहे. आता सचिनविनाच भारतीय खेळाडूंना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
तो म्हणाला, ‘‘सचिन आता आपल्यात असणार नाही, हे सत्य मुंबईतील कसोटी सामन्यादरम्यानच आम्ही पचवले होते. ते आता प्रत्यक्ष साकारण्याची वेळ आली आहे. सचिननंतरच्या पर्वाला आता सुरुवात होणार आहे, हे लक्षात घेऊनच आम्हाला खेळ करावा लागणार आहे.’’ परदेशातील कामगिरीविषयी धोनी म्हणाला, ‘‘प्रत्येक मालिका ही नवे आव्हान घेऊन येत असते. मागील मालिकांचे पराभवाचे खापर माथ्यावर घेऊन फिरण्यात कोणताच अर्थ नाही. भारतीय संघात बरेचसे युवा खेळाडू आहेत. त्यांना परदेशांत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवण्याची संधी मिळणार आहे. हीच आमच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. एकदिवसीय मालिकेत पराभूत व्हावे लागले असले तरी कसोटी मालिकेसाठी आम्ही सज्ज झालो आहोत. चुकांमधून आम्ही बरेच काही शिकलो आहोत. येथील खेळपट्टय़ा या वेगवान गोलंदाजीसाठी पोषक आहेत. त्यामुळे अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी करण्यावर आमचा भर असेल.’’
तो पुढे म्हणाला, ‘बेनोई येथील सराव सामना पावसामुळे रद्द झाला. परंतु आम्ही सराव केला आहे. एकदिवसीय मालिकेतून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. कुठल्या टप्प्यावर चेंडू टाकावे याचे गोलंदाजांना तर कोणते चेंडू सोडावेत, कोणते खेळावेत याविषयी फलंदाजांना कळले आहे. त्यामुळे फलंदाजांसह वेगवान गोलंदाजांनाही चांगले कामगिरी करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.’’

भारताच्या युवा फलंदाजांची दक्षिण आफ्रिकेतील वेगवान आणि उसळी मिळणाऱ्या खेळपट्टय़ांवर खरी कसोटी लागणार आहे. भारतीय संघ ज्या संक्रमणावस्थेतून जात आहे, त्यातून परदेशातील खेळपट्टय़ांवर भारतीय फलंदाजांचा खरा कस लागणार आहे. जगातल्या विविध देशांचा दौरा हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची कसोटी पाहणारा असतो. पुढील दोन्ही कसोटी सामन्यांत भारतीय फलंदाजांच्या मर्यादा पुन्हा सिद्ध होतील. क्रमवारीतील अव्वल क्रमांकाला साजेसा असा खेळ आम्ही करणार आहोत. ही कसोटी मालिका जिंकणे हेच आमचे ध्येय आहे. संघासाठी चांगली कामगिरी आणि नेतृत्व सांभाळण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वाँडर्सच्या खेळपट्टीवर सकाळी दव असणार आहे. त्यामुळे पहिला डाव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ग्रॅमी स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार

प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, प्रग्यान ओझा, झहीर खान, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार आणि वृद्धिमान साहा.
दक्षिण आफ्रिका : ग्रॅमी स्मिथ (कर्णधार), ए बी डी व्हिलियर्स, हशिम अमला, जे. पी. डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, डीन इल्गर, इम्रान ताहीर, जॅक कॅलिस, रॉरी क्लेन्व्हेल्ड, मॉर्ने मॉर्केल, अलव्हिरो पीटरसन, रॉबिन पीटरसन, व्हेरॉन फिलँडर, डेल स्टेन आणि थामी सोलेकिल.
सामन्याची वेळ : दु. २.०० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट वाहिनीवर.