भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केलेल्या मतानुसार, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताची मदार ही फलंदाजीवर असणार आहे. टी-२० मालिका २-१ ने जिंकत भारताने इंग्लंड दौऱ्याची आक्रमक सुरुवात केली होती, मात्र वन-डे मालिकेत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. १ ऑगस्टपासून दोन्ही देशांमधील ५ कसोट सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
“कसोटी क्रिकेट रंगतदार होण्यासाठी तुम्हाला एका डावात किमान ४०० धावा करणं गरजेचं आहे. जो संघ ४०० धावांचा टप्पा पार करेल, तो सामन्यात बाजी मारेल.” इडन गार्डन्स मैदानावर बोलत असताना गांगुलीने भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्याबद्दल आपलं मत मांडलं. भारताकडे ही मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. भारताचा संघ समोतल आहे. जर भारतीय फलंदाजांनी संयमीपणे फलंदाजी केली तर ते सामन्यात बाजी मारु शकतात असंही सौरव म्हणाला.
अवश्य वाचा – भुवनेश्वरची दुखापत भारताला इंग्लंड दौऱ्यात महाग पडू शकते – सचिन तेंडुलकर
सध्या कसोटी क्रमवारीत भारताचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा संघ हा पाचव्या स्थानावर आहे. मात्र इंग्लंडमधील वातावरण व गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्ट्या पाहून इंग्लंडचा संघ भारतासाठी डोईजड ठरु शकतो. त्यामुळे गांगुलीच्या मतानुसार १ ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या मालिकेत भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.