भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज इरफान पठाणला आपल्या पत्नीसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केल्यामुळे ट्रोल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने आपली पत्नी सफा बेगसाठी एक रोमँटिक गाणं म्हणलं होतं. यावेळी नेटीझन्सनी त्याच्या या अंदाजाला आपली पसंती दर्शवली. मात्र केवळ आपल्या पत्नीसोबतचा फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे इरफानला आपल्या चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.

फेसबुकवर टाकलेल्या फोटोत इरफानची पत्नी सफाने आपला अर्धा चेहरा हाताने झाकला आहे. नखांना लावलेलं नेलपॉलिश, अर्धवट झाकलेले हात यामुळे इरफानला त्याच्या चाहत्यांनी ट्रोल केलं आहे. तू पठाण आहेस, आणि एका पठाणाने आपल्या पत्नीसोबतचे असे फोटो टाकणं गैर असल्याचं इरफानच्या चाहत्यांनी त्याला सुनावलं आहे.

आपल्या पत्नीसोबतचा इरफानचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना आवडलेला नाहीये. मात्र त्यावर आलेल्या प्रतिक्रीया या अधिक धक्कादायक आहेत. अनेक चाहत्यांनी यावेळी इरफानला, तू सच्चा मुसलमान नसल्याचं सुनावलं. काहींनी तर इरफानला तू पठाण असून तू असं कृत्य कसं करु शकतोस, हे तुला शोभतं का असं विचारलं आहे?

इरफानची पत्नी सफा ही सौदी अरेबियातल्या जेहाद या शहरातली आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इरफान आणि सफा यांचं लग्न पार पडलं. नुकताच सफाने एका गोंडस मुलालाही जन्म दिला आहे. गेले अनेक महिने इरफान पठाण आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामातही इरफानने गुजरातच्या संघाच प्रतिनिधीत्न केलं होतं. या सर्व प्रकारावर इरफानने अद्यापही काही प्रतिक्रीया दिलेली नाहीये. मात्र आपल्या पत्नीसोबत टाकलेल्या फोटोवरुन एखाद्या खेळाडूला ट्रोल करणं हा नक्कीच दुर्दैवी प्रकार आहे.

Story img Loader