प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारायची आणि नंतर त्या धावसंख्येचा यशस्वी बचाव हे सूत्र अवलंबत भारतीय संघाने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी२० सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला पुढचा सामना गुवाहाटी इथे २८ तारखेला होणार आहे. भारताने २३५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने १९१ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला खरा पण भारतीय फलंदाजांनी मनमुराद फटकेबाजी केली. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड जोडीने सहाव्या षटकात ७७ धावांची सलामी दिली. जैस्वालने ९ चौकार आणि २ षटकारांसह २५ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. यानंतर ऋतुराजला इशान किशनची साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. इशानने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आणि या मालिकेसाठी कर्णधाराच्या भूमिकेत असणारा सूर्यकुमार यादव १९ धावा करुन तंबूत परतला. ऋतुराज गायकवाडने एक बाजू सांभाळत अर्धशतकी खेळी साकारली. त्याने ४३ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. रिंकू सिंगने अवघ्या ९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३१ धावा केल्या आणि भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर २३६ धावांचं लक्ष्य ठेवलं. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन एलिसने ३ विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू शॉर्ट, जोश इंगलिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांना झटपट गमावलं. पाठोपाठ स्टीव्हन स्मिथही तंबूत परतला. यानंतर मार्कस स्टॉइनस आणि टीम डेव्हिड यांनी ३८ चेंडूत ८१ धावांची शानदार भागीदारी रचली. रवी बिश्नोईने ही जोडी फोडली. डेव्हिडने ३७ धावांची खेळी केली. थोड्या अंतरात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर मार्कस स्टॉइनस बाद झाला. त्याने २५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. प्रसिध कृष्णाने शॉन अबॉटला त्रिफळाचीत केलं. यानंतर मॅथ्यू वेडचा ४२ धावांचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करली. भारतातर्फे प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन विकेट्स पटकावल्या. अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian bowlers proved effective against australia in run feast psp
Show comments