अन्वय सावंत

मुंबई : बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली आणि ब्रेंडन मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्येही आक्रमक शैलीत खेळण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांचे फलंदाज धोका पत्करत असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघालाही त्यांना अडचणीत टाकण्याची संधी मिळते. या संधीचा फायदा घेण्यासाठी भारतीय गोलंदाज सक्षम आहेत, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने व्यक्त केले. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना १ जुलैपासून बर्मिगहॅम येथे खेळवला जाणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या या मालिकेतील पहिल्या चार सामन्यांअंती भारताकडे २-१ अशी आघाडी होती. मात्र, त्यानंतर इंग्लंड संघाच्या खेळण्याच्या पद्धतीत कायापालट झाला आहे. प्रथमच स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यांनी नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. या मालिकेत स्टोक्ससह जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांसारखे इंग्लिश फलंदाज आक्रमक शैलीत खेळताना दिसले. परंतु, भारतीय गोलंदाजांविरुद्ध ही आक्रमकता कायम ठेवणे इंग्लंडच्या फलंदाजांसाठी आव्हान ठरू शकेल, असे आगरकरला वाटते.

‘‘स्टोक्स-मॅककलम या नव्या व्यवस्थापनाने इंग्लंडच्या खेळाडूंना अधिक मोकळीक दिली आहे. मात्र, त्यांनी आक्रमक शैलीत खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे फलंदाज धोका पत्करत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या काही डावांमध्ये त्यांची अडखळती सुरुवात झाली होती. त्यानंतर रूट, स्टोक्स आणि विशेषत: बेअरस्टो यांनी त्यांचा डाव सावरला. मात्र, भारताविरुद्ध अशा चुका करणे इंग्लंडला महागात पडू शकेल. इंग्लंडच्या या आक्रमक फलंदाजांना रोखण्याची भारतीय गोलंदाजांमध्ये क्षमता आहे. भारताची गोलंदाजी न्यूझीलंडच्या तुलनेत उजवी आहे,’’ असे आगरकर म्हणाला.  या  कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी क्रीडा वाहिन्यांवर केले जाणार आहे.  

Story img Loader