मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी घवघवीत पदकं मिळवली आहेत. बॉक्सिंग संघटनांनी आपले संघटनात्मक मतभेद दूर ठेवण्याचा तो दृश्य परिणाम आहे.
संघटनात्मक स्तरावरील अंतर्गत मतभेद, प्रोत्साहनाचा अभाव, अनेक संघटनांमुळे खेळाडूंची संभ्रमावस्था, शासनाकडून मर्यादित सहकार्य यामुळे मध्यंतरी भारतीय बॉक्सिंग क्षेत्राची पीछेहाट झाली होती. तथापि गेल्या दीड वर्षांमध्ये भारतीय बॉक्सिंग क्षेत्राने कात टाकली आहे. नवीन संघटनेने केलेले चांगले प्रयत्न, खेळाडूंनी सकारात्मक वृत्ती ठेवीत मिळविलेले सातत्यपूर्ण यश यामुळे भारतीय बॉक्सिंग क्षेत्रात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय, भारतीय खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धा, बेलग्रेडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये घवघवीत पदके मिळविली आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही लुटुपुटुची स्पर्धा मानली जात असली तरी भारतीय खेळाडूंसाठी विशेषत: बॉक्सिंग, कुस्ती आदी वैयक्तिक क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आपले कौशल्य व शारीरिक तंदुरुस्तीचा अंदाज बांधण्यासाठी खूप उपयुक्त असते. त्यामुळेच त्यांनाही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीबाबत उत्सुकता होती. या स्पर्धेत भारताच्या गौरव सोळंकी, विकास कृष्णन व एम. सी. मेरी कोम यांनी सोनेरी कामगिरी केली. अमितकुमार, मनीष कौशिक, सतीशकुमार हे रौप्यपदकाचे मानकरी ठरले. महंमद हुसामुद्दिन, मनोजकुमार व नमन तन्वर यांना कांस्यपदक मिळाले. भारतीय पुरुष संघाचे वैशिष्टय़ म्हणजे भारताचे आठ स्पर्धक तेथे सहभागी झाले होते व प्रत्येकाने पदकाची कमाई केली. आशियाई युवा स्पर्धेत भारताच्या अंकितकुमारने रौप्यपदक मिळविले तर भावेशकुमार व अमनकुमार यांनी कांस्यपदक जिंकले. या तीन खेळाडूंबरोबरच आकाश संगवान व विजयदीप यांनी जागतिक स्पर्धेची पात्रताही पूर्ण केली आहे. बेलग्रेडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, पाच रौप्य व पाच कांस्यपदकांची लयलूट केली. त्यामध्ये महाराष्ट्राच्या साक्षी गायधनी हिने रौप्यपदक मिळवीत मराठी माणसाची मोहोर तेथे नोंदविली.
राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक बदल झाल्यानंतर बॉक्सिंग क्षेत्रातील मरगळ दूर होत चालली आहे. रिओ येथील ऑलिम्पिकपूर्वी झालेल्या पात्रता फेरीत मेरी कोम हिला अपयश आले होते. भारतीय संघटनांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे पात्रता स्पर्धेत भारतीय संघटनेचा कोणीही प्रतिनिधी नसल्यामुळे त्याचा फटका आपल्याला बसला असे मेरी कोम हिने सांगितले होते. एक मात्र नक्की की कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या वेळी अनेक देशांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित असले की त्याचा सकारात्मक परिणाम लढतींच्या निकालांवर होत असतो. रिओ ऑलिम्पिकच्या वेळी भारताचे बॉक्सिंगमधील प्रतिनिधित्व अत्यंत नगण्य होते त्यामागे संघटनात्मक स्तरावर असलेले मतभेद हेदेखील महत्त्वाचे कारण होते.
खेळाडूंच्या परदेशी स्पर्धामधील सहभाग, परदेशी प्रशिक्षक, विविध शिष्यवृत्ती, सवलती, नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी आरक्षित जागा आदी अनेक कारणांसाठी शासनाची मदत अनेक खेळांच्या संघटनांना पाहिजे असते. बॉक्सिंग क्षेत्रही त्यास अपवाद नाही. शासनाची मदत हवी असेल तर प्रथम संघटनात्मक स्तरावरील मतभेद दूर करावेत असा सल्ला शासनाकडून आल्यानंतर बॉक्सिंग संघटकांनी त्याचा गांभीर्याने विचार करीत राष्ट्रीय स्तरावर पुन्हा भक्कम मोट बांधली. साहजिकच त्याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंवर दिसून आला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळविण्यासाठी परदेशी प्रशिक्षक, परदेशातील स्पर्धामधील वाढता सहभाग, कठोर व एकाग्रतेने केलेले परिश्रम आदी गोष्टींची नितांत आवश्यकता असते. त्या दृष्टीनेच मे २०१७ पासून ब्राझीलमधील ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तिवा सँटियागो यांना भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंना परदेशातील अनेक स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी देण्यात आली आहे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नियमित पोषक व संतुलित आहाराबाबतही लक्ष देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा महत्त्वपूर्ण वाटा
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी नव्हे तर भविष्यातील अनेक स्पर्धा विचारात घेऊन सँटियागो यांच्याबरोबरच भारतीय पुरुष व महिला संघांकरिता आणखी साहाय्यक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या जयसिंग पाटील व राकेश कळसकर यांचा समावेश आहे. या दोन्ही प्रशिक्षकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भरघोस यश मिळविले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाकरिता कशी तयारी करावी लागते, कोणते तंत्र वापरावे लागते, कशी तंदुरुस्ती ठेवावी याचे भरपूर ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा फायदा भारतीय खेळाडूंना झाला. त्यातही हे दोन्ही प्रशिक्षक खूप ज्येष्ठ नसल्यामुळे त्यांचे भारतीय खेळाडूंबरोबर मित्रत्वाचे नाते जुळले आहे. साहजिकच खेळाडू त्यांच्याबरोबरच मनमोकळेपणाने संवाद साधू शकत आहेत. पाटील हे पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळविणाऱ्यांपैकी पाच पुरुष खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमध्ये प्रशिक्षण घेत असल्यामुळे त्याचाही फायदा खेळाडूंना झाला.
जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धामध्ये भरघोस यश मिळविण्यासाठी अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव घेणे जरुरीचे असते. हे लक्षात घेऊनच गेली दीड वर्षे भारतीय खेळाडूंना अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळाडूंना भाग घेण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यामागे हेतू हाच होता की अधिकाधिक खेळाडूंना परदेशी खेळाडूंबरोबर लढत देण्याचा अनुभव मिळेल. सुदैवाने केंद ्रशासनाने परदेशातील स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी प्रवास खर्चाची जबाबदारी उचलली. यंदा आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्याचप्रमाणे आगामी दोन वर्षांमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा तसेच २०२० ची ऑलिम्पिक स्पर्धा या दोन्ही स्पर्धामध्ये भारताच्या अधिकाधिक खेळाडूंना भाग घेण्याची संधी मिळेल हा हेतू डोळ्यासमोर ठेवीत अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा व नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव देण्याबाबत प्राधान्य देण्यात आले. गेल्या दोन महिन्यांमध्ये भारताच्या बॉक्सर्सनी पदकांची लयलूट केली आहे. त्यामध्ये अनेक नवोदित व युवा खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडूंच्या या कामगिरीमुळे पालकही आपल्या मुलामुलींना बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले आहेत. मेरी कोम, विकास कृष्णन आदी ज्येष्ठ खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवीत अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये घवघवीत यश मिळविण्यासाठी जिद्दीने सराव करू लागले आहेत. भारतीय बॉक्सिंग क्षेत्रासाठी ही अतिशय सुखकारक गोष्ट आहे. विजेंदरसिंग व मेरी कोम यांचा ऑलिम्पिक पदकाचा वारसा नवोदित खेळाडूंनी पुढे चालविला पाहिजे. मेरी कोमसारखी सुपरमॉम खेळाडू तीन मुले असताना अजूनही ऑलिम्पिक पदकासाठी नेहमीच कठोर मेहनत करीत असते. नवोदित खेळाडू तिच्याकडून प्रेरणा घेत बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवतील अशी आशा आहे.
सौजन्य – लोकप्रभा