रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित करण्यासाठी एम. सी. मेरी कोम (५१ किलो), शिवा थापा (५६ किलो) व एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो) यांना आणखी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. त्यांनी आशियाई/ओशेनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारताच्या या तीनही खेळाडूंचे या स्पर्धेतील कांस्यपदक निश्चित झाले आहे. शिवा व देवेंद्रो सिंग यांना उपांत्य फेरीत जरी पराभव स्वीकारावा लागला तरी त्यांना कांस्यपदक विजेत्या खेळाडूंमधील लढतीद्वारे ऑलिम्पिक प्रवेश करण्याची संधी आहे. मेरी कोमने उपांत्यपूर्व फेरीत नेस्थी पेटेसिओ हिचा ३-० असा पराभव केला. तिला आता चीनच्या रेन कान्केन हिच्याशी खेळावे लागणार आहे. रेन हिने तीन वेळा विश्वविजेतेपद मिळविले आहे. २०१० च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने मेरी कोम हिला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का दिला होता.
जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या शिवा याने जपानच्या अराशी मोरिसाका याच्यावर २-१ असा विजय मिळविला. त्याला आता कझाकिस्तानच्या कैरात येरालीयेव याच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. देवेंद्रोने चीन तैपेई देशाच्या पो वेई तुई याच्यावर निर्णायक मात केली. त्याच्यापुढे रोगेन लादोन याचे आव्हान असणार आहे.
भारताच्या एल. सरिता देवीला (६० किलो) उपांत्यपूर्व फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. व्हिएतनामच्या लुओ दुयेनने तिला २-१ असे हरविले. पुरुषांच्या ६० किलो गटात धीरज रंगीला पराभवाला सामोरे जावे लागले. ६० किलो गटात त्याला चार्ली सोरेझ याने ३-० असे सहज पराभूत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा