२८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला संघदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९८च्या हंगामात क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या स्पर्धेत क्रिकेट खेळवणे शक्य झाले नाही. आता प्रथमच बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. एकूण आठ क्रिकेट संघ स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांचे दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बार्बाडोस ‘अ’ गटामध्ये आहे. तर, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रीका आणि श्रीलंका ‘ब’ गटामध्ये आहेत.

हेही वाचा – World Test Championship: ठरलं! ‘या’ वर्षी क्रिकेटच्या पंढरीवर रंगणार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे अंतिम सामने

भारतीय मुलींचा पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या मते, ‘संघातील खेळाडूंनी आपल्यात आक्रमकता विकसित केली आहे. असे असले तरी भारतीय संघ अजूनही विश्वविजेता बनण्याच्या क्षमतेपासून दूर आहे. परंतु, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेल्या संघाने सुवर्णपदक जिंकण्यासाठी आक्रमक खेळ करण्याचा निर्धार केला आहे.’

हेही वाचा – Formula 1: वेगाच्या बादशाहने केली निवृत्तीची घोषणा; २०२२चा हंगाम ठरणार शेवटचा

आज (२८ जुलै) भारतीय महिला क्रिकेट संघाचे वैकल्पिक प्रशिक्षण सत्र होते. त्यासाठी सहा खेळाडू एजबस्टनला गेले होते. हरमनप्रीत कौरही सरावाच्या वेळी गोल्फ क्लबमध्ये सराव केल्यानंतर हॉटेलमध्ये गेली आहे. शिवाय, पहिल्याच दिवशी भारतीय संघाला सामना खेळायचा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याची शक्यता फारच कमी आहे.

भारतीय संघ: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, सब्भिनेनी मेघना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, स्नेह राणा, मेघना सिंग, तनिया भाटिया, हरलीन देओल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian captain harmanpreet kaur wants aggressive approach in commonwealth games 2022 vkk