महिला आयटीएफ टेनिस स्पर्धा
प्रार्थना ठोंबरे, कायरा श्रॉफ व रश्मी तेलतुंबडे यांच्या पराभवामुळे भारताचे एनईसीसी करंडक महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेतील एकेरीमधील आव्हान संपुष्टात आले.
डेक्कन जिमखाना क्लबवर सुरु असलेल्या या स्पर्धेत ठोंबरे हिला चीनची खेळाडू जिआ जिंगलुई हिने ६-३, ६-१ असे पराभूत केले आणि तिसरी फेरी गाठली. बार्शीची खेळाडू असलेल्या ठोंबरे हिला या स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश मिळाला होता. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये ठोंबरे हिने जिआ हिला चांगली लढत दिली. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीस तिच्या उजव्या पायातील स्नायू दुखावला. तिने तात्पुरते उपचार करुन घेतले, मात्र तिच्या खेळातील चापल्य कमी झाले. त्याचा फायदा घेत जिआने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला आणि हा सेट घेत सामना जिंकला.
चीनची आणखी एक खेळाडू शेंगोई नानसुन हिने तेलतुंबडे हिच्यावर ६-२, ६-० असा दणदणीत विजय मिळविला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात नानसुन हिने पहिल्या सेटमध्ये फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. तिने या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये तिच्या वेगवान व चतुरस्र खेळापुढे तेलतुंबडे हिचा बचाव निष्फळ ठरला. सहाव्या मानांकित नोप्पावान लेर्तचीवाकारन हिने कायरा श्रॉफ हिची घोडदौड रोखली. थायलंडच्या या खेळाडूने हा सामना ६-२, ६-१ असा जिंकून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
बेलारुसच्या इलोना क्रेमेन हिने चुरशीने झालेल्या लढतीत जपानच्या शिहो अकिता हिचा ६-०, २-६, ६-२ असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित ताडेजा माजेरिक हिने अपराजित्व राखताना चीन तैपेईच्या येई हसुआन ली हिच्यावर ६-३, ६-४ अशी सरळ दोन सेट्समध्ये मात केली.
बसाक इराडीन हिने संघर्षपूर्ण लढतीनंतर जॉर्जियाच्या ओक्साना कलाशनिकोव्हा हिच्यावर ६-७ (४-७), ७-५, ६-३ असा रोमहर्षक विजय नोंदविला.     
कुमार टेनिस : सिद्धान्त भाटिया, ऋत्विक चौधरी उपान्त्य फेरीत
पुणे : अग्रमानांकित सिद्धान्त भाटिया व तृतीय मानांकित ऋत्विक चौधरी यांनी प्रवीण चषक कुमार राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेतील मुलांच्या १२ वर्षांखालील गटात उपान्त्य फेरी गाठली.
सिद्धान्तने ए. वामसी कृष्णा (आंध्र प्रदेश) याच्यावर ३-५, ५-३, ७-३ असा विजय मिळविला. पहिला सेट गमावल्यानंतर सिद्धान्त याने परतीचे फटके व सव्‍‌र्हिस यावर चांगले नियंत्रण राखून विजयश्री खेचून आणली. आंध्र प्रदेशच्या ऋत्विक याने अपराजित्व राखताना गुंजन जाधव याचा ४-०, ४-० असा धुव्वा उडविला. त्याने क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ केला.
मध्य प्रदेशच्या टेरेन्स दास याने द्वितीय मानांकित रोहन रेड्डी याच्यावर ४-२, ५-३ अशी मात करीत सनसनाटी विजय नोंदविला. सिद्धान्त भाटिया याने १४ वर्षांखालील गटातही आव्हान राखले. त्याने संकेत आवळे याच्यावर ६-२, ६-३ अशी सरळ दोन सेट्समध्ये मात करताना अव्वल दर्जास साजेसा खेळ केला.