Indian Chess Team Celebrates Chess Olympiad Win with Rohit Sharma Style: भारताच्या बुद्धिबळ संघाने चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आणि या स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकले. भारतीय पुरुष संघाने ११व्या आणि अंतिम फेरीत स्लोव्हेनियाचा ३.५-०.५ असा पराभव केला तर महिला संघाने अझरबैजानचाही त्याच फरकाने पराभव केला. भारतीय पुरुष संघाने यापूर्वी २०१४ आणि २०२२ मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. भारतीय महिला संघाने २०२२ मध्ये चेन्नई येथे कांस्यपदक जिंकले होते. या दुहेरी सुवर्णपदकानंतर ट्रॉफी स्वीकारताना महिला आणि पुरूष संघाने रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये आनंद साजरा केला.
भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर, दोन्ही भारतीय संघ हातात तिरंगा घेऊन व्यासपीठावर उभे होते. काही क्षणांनंतर, तानिया सचदेव आणि डी गुकेश यांनी ट्रॉफीसह आयकॉनिक वॉक करत सेलिब्रेशन केलं. भारताच्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजयानंतर ट्रॉफी स्विकारल्यानंतर रोहित शर्मासारखा आयकॉनिक वॉक करत तानिया आणि गुकेश संघाजवळ पोहोचले आणि ट्रॉफी उंचावत संघाला दिली. २०२२ च्या FIFA विश्वचषक स्पर्धेतील विजयानंतर लिओनेल मेस्सीनेही असा आयकॉनिक वॉक करत संघाबरोबर सेलिब्रेशन केले होते.
डी गुकेशने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास लिहिला आहे. गुकेशने पुरुष विभागात भारताला त्यांच्या पहिल्या-वहिल्या ऑलिम्पियाड विजयाचे नेतृत्त्व केले, कारण तो स्पर्धेत अपराजित राहिला, गुकेशने त्याच्या १० सामन्यांपैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि एक सामना अनिर्णित राहिला. त्याच्या व्यतिरिक्त, भारताच्या अर्जुन एरिगाईसीला ११ सामन्यांपैकी १० विजयांसह सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. या जोडीने भारताला स्पर्धेत २२ पैकी २१ संभाव्य गुण मिळवून देत देशासाठी इतिहास रचण्यात मदत केली.
महिला बुद्धिबळ संघानेही पटकावलं ऐतिहासिक सुवर्णपदक
पुरुष संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर, हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव आणि अभिजित कुंटे यांचा समावेश असलेल्या महिला संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतासाठी ऐतिहासिक दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
भारतीय महिला संघासाठी, डी हरिका (३३ वर्षे) ने अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली आणि पहिल्या बोर्डवर तांत्रिक श्रेष्ठता दाखवली आणि गुणे मामदजादावर विजय मिळवला. १८ वर्षीय दिव्या देशमुखने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत तिसऱ्या बोर्डमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. तिने ११ पैकी ९.५ गुण मिळवून गोवर बेदुलायेवाचा पराभव केला. आर वैशाली (२३ वर्षे) हिने उलविया तालियेवाविरूद्ध ड्रॉ खेळल्यानंतर, वंतिका अग्रवाल (२१ वर्षे) हिने खानिम बालाझायेवावर नेत्रदीपक विजय मिळवून कठीण परिस्थितीतून पुनरागमन केले आणि भारतीय संघासाठी सुवर्णपदक निश्चित केले.
महिला संघाने एकूण १९ गुण मिळवले जे त्यांना अंतिम फेरीत जिंकण्यासाठी आवश्यक होते. आदल्या दिवशी भारत आणि कझाकस्तान संयुक्तपणे आघाडीवर होते. पण कझाकस्तानने अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात ड्रॉ सामना खेळल्याने अझरबैजानवर विजय मिळवताच सुवर्णपदक भारतीय महिला संघाच्या नावे झाले.