‘‘एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे दिमाखदार स्ट्रोक्स खेळण्याकडे हल्लीच्या खेळाडूंचा कल असतो. पण कसोटी क्रिकेटमध्ये संयमाची आवश्यकता असते. पाच दिवसांच्या क्रिकेटसाठी लागणाऱ्या संयमाचाच या खेळाडूंमध्ये अभाव जाणवतो. राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणसारखे दोन खेळाडू होते. त्यांच्याकडे कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता होती. पण ते दोघेही निवृत्त झाले आहेत. आता फक्त सचिन तेंडुलकर संघात आहे. पण त्याने तरी भारतीय संघाला किती वष्रे तारायचे,’’ असा सवाल भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांनी केला.
१५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेबाबत ७९ वर्षीय बापू नाडकर्णी यांनी ‘लोकसत्ते’शी खास बातचीत केली. भारतीय मैदानांवरील कसोटी मालिका भारतच जिंकणार, असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. १९६३-६४ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्या मालिकेतील अखेरच्या कानपूर कसोटीमध्ये नाडकर्णी यांनी दोन्ही डावांत झुंजार फलंदाजी करीत वाचवली होती. याच मालिकेतील मद्रास कसोटी तर नाडकर्णी यांच्यासाठीच विशेष ओळखली जाते. त्या कसोटीत ३२-२७-५-० असे नाडकर्णी यांच्या गोलंदाजीचे प्रभावी पृथक्करण होते. या फिरकी गोलंदाजाने सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम त्यावेळी केला होता. त्यांच्या गोलंदाजीचा ‘स्पेल’ तब्बल ११४ मिनिटे चालला होता.
१९६३-६४च्या मद्रास कसोटी सामन्यांत तुम्ही सलग २१ षटके निर्धाव टाकली होती. त्याबाबतच्या काही आठवणी?
त्या घटनेला आता ५० वष्रे झाली आहेत. तो आता इतिहास झाला.. संपले! त्या कसोटी सामन्यात मी फक्त माझी गोलंदाजी करीत होतो. इंग्लिश फलंदाजांना माझी गोलंदाजी खेळताच येत नव्हती, एवढेच.
तुमच्या कसोटी कारकीर्दीतील एकमेव कसोटी शतकही इंग्लंडविरुद्ध साकारले आहे. त्याच मालिकेतील कानपूरला झालेल्या त्या यादगार कसोटी सामन्याविषयी काय सांगाल?
मला बऱ्याचदा आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवत असत. त्यामुळे मला फार शतके झळकावता आली नाहीत. इंग्लंडच्या ५५९ धावसंख्येपुढे भारताचा पहिला डाव २६६ धावांवर कोसळल्यामुळे फॉलो-ऑनची नामुष्की पदरी पडली होती. पहिल्या डावात मी नाबाद ५२ धावांची खेळी साकारली होती. अखेरच्या दिवशी कसोटी वाचविणे भारतासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे कर्णधार नवाब पतौडी यांनी मला पॅड काढूच नको, असे फर्मावले. मी दुसऱ्या डावात नाबाद १२२ धावांची खेळी उभारली. ही कसोटी जिंकणे तर शक्य नव्हते. पण मी आणि दिलीप सरदेसाईने भक्कम भागीदारी रचून ही कसोटी अनिर्णीत राखली. त्यामुळेच ही पाच कसोटी सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
भारतात फिरकीच्या बळावरच कसोटी जिंकल्या जातात का?
असे काहीही नसते. हे सारे प्रसारमाध्यमांनीच निर्माण केलेले स्तोम आहे. प्रत्येक खेळाडू संघासाठीच खेळतो. प्रत्येकाला समान संधी मिळतेच.
इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना तुमच्या काळात काय महत्त्व असायचे?
त्या वेळी इंग्लंडच्या संघाला फार मान होता. या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा होता. त्या तुलनेत आताचा संघ सामान्य आहे.
सध्याच्या भारतीय संघाविषयी काय सांगाल?
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा अतिशय चांगला आहे. आमच्यापेक्षा या संघातील खेळाडू अधिक गुणी आहेत. पण ही मंडळी थोडी घाई करतात. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे आपल्या खेळाडूंचा संयम थोडा कमी होत चालला आहे. या वेगवान क्रिकेटमुळे हल्लीच्या खेळाडूंना मोठमोठे स्ट्रोक्स खेळण्यातच धन्यता वाटते. कसोटी क्रिकेटमध्ये संयमाची अधिक आवश्यकता असते. कारण ते पाच दिवसांचे क्रिकेट असते. तिथे घाई करून चालत नाही. तेवढे फक्त टाळायला हवे.
आगामी भारत-इंग्लंड मालिकेविषयी तुमचे काय भाकीत असेल?
आपण ही मालिका जिंकलो नाही, तर मला आश्चर्य वाटेल. आपण ही मालिका नक्की जिंकू, यावर माझा विश्वास आहे. आपण भारतात हे अनेकदा करून दाखविले आहे. भारतीय मैदानांवर आपण नाही जिंकणार, तर कोण जिंकणार?   

Story img Loader