Indian Fans Trolled Virat Kohli On Social Media : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सपशेल अपयशी ठरला. भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटला धावांचा सूर गवसला नाही. विराट कोहली फक्त १४ धावा करून स्वस्तात माघारी परतला. मिचेल स्टार्कच्या वेगवान चेंडूवर विराट स्लिपमध्ये झेलबाद झाला. भारतीय संघाला त्याच्या धावांची आवश्यकता होती. परंतु, विराटला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. अशाप्रकारच्या आयसीसीच्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये विराट पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याने टीम इंडियाच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी ट्वीटरवर विराटला ट्रोल केलं आहे. विराट कोहली मोठ्या सामन्यांमध्ये धावा काढण्यात सपशेल अपयशी ठरल्याने अनेकांनी त्याला धारेवर धरले आहे. जाणून घेऊयात चाहत्यांनी नेमकं काय म्हटलं आहे.
विराट कोहलीच्या खराब कामगिरीबाबत ट्वीटरवर प्रतिक्रियांचा वर्षाव
आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यात खेळाडूंना ट्रोल करणं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नाहीय. या सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळं आगामी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी असेल, यावर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, विराट कोहली खरंच जादूगार आहे, कारण जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज असते, त्यावेळी तो गायब होतो. तर दुसरा एक नेटकरी म्हणाला, कधीही सचिन तेंडुलकरची तुलना विराट कोहलीशी करु नका.
‘त्या’ चेंडूवर विराट कोहली बाद झाला
भारताने टी ब्रेकआधी पहिल्या १० षटकात ३७ धावा फलकावर लागल्या असताना कर्णधार रोहित शर्मा (१५) आणि शुबमन गिल (१३) धावांवर बाद झाला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रोहित शर्माला बाद केलं. तर तर गिल स्कॉट बोलॅंडच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. भारताच्या पहिल्या इनिंगच्या १९ व्या षटकात मिचेल स्टार्कने अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. चेंडूने उसळी घेतल्यानं विराट कोहलीने त्या चेंडूवर सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू बॅटला लागून दुसऱ्या स्लिपच्या दिशेनं गेला आणि विराट झेलबाद झाला.