भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबंद फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ऋषभ पंत हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. फलंदाजी करत असताना अनेकदा ऋषभ पंत जोखीम उचलत फटकेबाजी करत असतो. याचा फटकाही त्याला अनेकदा बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा ऋषभ पंतच्या फलंदाजीवरुन टीकेची झोड उठली आहे.
पंतने फेहलुकवालोच्या गोलंदाजीवर षटकार लगावण्याचा प्रयत्न केला असता झेलबाद झाला. ऋषभ पंत पुन्हा एकदा वाईट पद्धतीने बाद झाल्यामुळे चर्चा रंगली आहे.
शिखर धवन ६१ धावांवर बाद झाल्यानंतर पंत मैदानात आला होता. पहिल्याच चेंडूवर पंतने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम त्याला शून्य धावांवर परतावं लागलं. यानंतर विराट कोहलीही ६५ धावांवर बाद झाला. चहरने ३३ चेडूंमध्ये ५४ धावा केल्या. चहरच्या खेळीमुळे भारतीय संघ २८८ धावांचा पाळलाग पूर्ण कऱण्याच्या जवळ आला होता. पण यानंतर पाच धावात तीन गडी बाद झाले आणि भारताने चार चेंडू शिल्लक असतानाही चार धावांनी हा सामना गमावला.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने पंतच्या खेळीचं विश्लेषण केलं असून तो अशाच पद्धतीने खेळत राहील असं सांगितलं आहे. यावेळी त्याने जोखीम तसंच गेल्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या ६५ धावांचाही उल्लेख केला.
“तो जसा आहे तसं त्याला स्वीकारलं पाहिजे. तो सामने जिंकून देणारे खेळी करु शकतो, पण याचवेळी तो आज खेळला तसे बेधडक फटकेही खेळणार. जर व्यवस्थापनाकडे अशा खेळाडूंना पाठिंबा देण्याचा संयम असेल तर भविष्यात त्याला अजून संधी मिळताना पाहू शकतो,” असं गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर सामना संपल्यानंतर बोलताना म्हटलं आहे.
“तुम्ही जे पेरता, तेच उगवतं. पंत आज ज्या पद्धतीने खेळत आहे तसाच खेळत राहणार. तो विराट कोहलीसारखा नाही, जो हळूहळू आपली खेळी उभारत जाईल. संघ व्यवस्थापन त्याच्यात बदल करु शकतं, पण हो हे एका रात्रीत होणार नाही, यासाठी वेळ लागले,” असंही गंभीरने सांगितलं.
दरम्यान सामन्यासंबंधी बोलताना गंभीरने सांगितलं की, “जर कोहलीसारख्या एखाद्याने सामना संपवला असता तर त्यात नवीन काही नव्हतं. पण श्रेयस, सूर्यकुमार यांच्यापैकी कोणीतरी सामना संपवल्याचं पहायला मिळणं अपेक्षित आहेत. जर यांच्यापैकी एकाने सामना जिंकून दिला असता तर मधल्या फळीतील फलंदाज स्पर्धेत विजयी ठरला असता”.