Gautam Gambhir gets special message from Special Person: भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांना एक खास संदेश मिळाला. अतिशय कणखर आणि परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध गंभीर हा संदेश ऐकल्यानंतर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. बीसीसीआयने नुकताच हा व्हीडिओ शेअर केला असून यामध्ये गंभीर यांना हा सुखद धक्का मिळाला आहे.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक, भारताचे माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ अशी बिरुदावली पटकावणारे राहुल द्रविड यांनी गंभीर यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देताना ऑडिओ संदेश पाठवला. गंभीर यांना एका लॅपटॉपसमोर बसा अशी विनंती करण्यात येते. लॅपटॉपवर काय आहे याची कल्पना त्यांना देण्यात आलेली नसते. गंभीर लॅपटॉप उघडतात आणि त्यांना राहुल द्रविड यांचा आवाज ऐकू येऊ लागतो.
आपण नक्की काय करतो आहोत असं गंभीर मीडिया टीमला विचारतो. मीडिया टीम त्यांना सांगते की एका खास माणसाने तुमच्यासाठी खास संदेश पाठवला आहे. लॅपटॉपवर स्पेसबारचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला हा संदेश ऐकता येईल. गंभीर तसं करतात आणि द्रविडचा यांचा संदेश सुरू होतो.
‘हाय गौतम, क्रिकेट जगतातल्या अतिशय बहुचर्चित अशा जबाबदारीसाठी तुला मनापासून शुभेच्छा. भारतीय संघाचा प्रशिक्षक ही माझी जबाबदारी संपून आता तीन आठवडे झाले आहेत. भारतीय संघाने ज्या पद्धतीने टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं आणि त्यानंतर संघाला जे प्रेम आणि पाठिंबा मिळाला ते सगळंच माझ्यासाठी स्वप्नवत होतं. बार्बाडोसमध्ये आणि काही दिवसांनंतर मुंबईत त्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संध्याकाळी, मी जे पाहिलं, अनुभवलं ते शब्दातीत आहे. बाकी कशापेक्षाही त्या आठवणी मला आयुष्यभर साथ देतील. प्रशिक्षक म्हणून काम करताना खेळाडूंशी झालेली मैत्री आयुष्यभर जपून ठेवेन. आम्ही एकत्र जे अद्भुत क्षण अनुभवले ते कायमस्वरुपी मनात कोरले गेले आहेत. तू आता भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून कार्यभार हाती घेतला आहेस, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुला प्रत्येक मोहिमेसाठी शंभर टक्के फिट संघ मिळेल अशी मला खात्री वाटते. तुला नशिबाची साथ मिळावी यासाठी प्रार्थना करतो. बाकी मंडळींपेक्षा प्रशिक्षकाने अभ्यासू आणि स्मार्ट असावं अशी अपेक्षा असते. तू या अपेक्षेला न्याय देशील. एकत्र खेळताना तुला देशासाठी सर्वस्व झोकून देताना मी पाहिलं आहे. तुझ्याबरोबर फलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना तुझा निर्धार आणि परिस्थितीला कधीही शरण न जाण्याची वृत्ती मी जवळून पाहिली आहे. अनेक आयपीएल हंगामांदरम्यान जिंकण्याची ऊर्मी मी पाहिली आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची तुझी हातोटी, खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करण्याचं कौशल्य तुझ्याकडे आहे. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी तू किती तळमळीने आणि निष्ठापूर्वक विचार आणि कृतीशील आहेस याची मला कल्पना आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करताना तुझे हे गुण संघासाठी दिशादर्शक ठरतील. भारतीय संघाच्या प्रशिक्षकाकडून खूप अपेक्षा असतात. आपल्या कामगिरीचं मूल्यमापनही कठोरपणे होतं. पण मला विश्वास वाटतो की कठीण काळात तू कधीच एकटा नसशील. भारतीय संघ, सपोर्ट स्टाफ, माजी खेळाडू, बीसीसीआय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाहते तुझ्या पाठीशी ठामपणे उभे असतील. आपण ज्या चाहत्यांसाठी खेळतो त्यांचं प्रेम टोकाचं असतं पण ते भक्कमपणे तुझ्यासाठी असतील. भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक या नात्याने एक शेवटची गोष्ट सांगतो- अतिशय कठीण प्रसंगात, दडपणाच्या क्षणी दीर्घ श्वास घे, स्थिर होऊन क्षणभर विचार कर. मला कल्पना आहे की तुला हे कठीण आहे पण चेहऱ्यावर स्मितहास्य असू दे. बाकी काहीही घडो, तुझ्या स्मितहास्याने चित्र पालटू शकतं. गौतम, नव्या मोहिमेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा! भारतीय संघाला तू नव्या शिखरावर नेशील हा विश्वास आहे’.
द्रविडचे शब्द थांबताच गंभीर बोलू लागतात. ते म्हणतात, ‘या संदेशावर कसा व्यक्त होऊ, मला माहिती नाही. हा संदेश माझ्यासाठी अतिशय जवळचा आहे. हा संदेश भारताच्या माजी प्रशिक्षकांकडून आलाय केवळ यासाठी महत्त्वाचा नाही. खेळताना मी ज्या माणसाला बघून असंख्य गोष्टी शिकलो त्यांचा हा संदेश मी मनात कायमस्वरुपी जपून ठेवेन. मी पाहिलेला सगळ्यात निस्वार्थी क्रिकेटपटू असं मी त्यांचं वर्णन करेन. भारतीय क्रिकेटसाठी राहुल यांनी सर्वतोपरी योगदान दिलं. संघाच्या भल्यासाठी त्यांनी अनेकविध जबाबदाऱ्या हाताळल्या. त्यांच्याकडून प्रत्येक पिढीने शिकण्यासारखं आहे. त्यांच्यासाठी भारतीय क्रिकेटचं हित हे सर्वोत्तम प्राधान्य होतं, आहे. वैयक्तिक पातळीपेक्षा त्यांनी नेहमी संघाला अग्रणी ठेवलं. मी सहसा भावुक होत नाही पण राहुल यांच्या संदेशाने मी भारावून गेलो आहे. राहुल द्रविड यांनी माझ्याकडे मशाल सोपवली आहे. त्यांचा वारसा चालवणं सोपं नाही. कामाप्रति सचोटी, निष्ठा आणि पारदर्शकता ठेऊन मी या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. देशवासीयांना आणि जो माणूस माझ्यासाठी आदर्श अनुकरणीय आहे त्यांना अभिमान वाटेल असं काम करू शकेन’.
राहुल द्रविड यांचं योगदान
द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला. द्रविड यांच्या प्रशिक्षणातच भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. भारतीय संघाचे माजी कर्णधार असणाऱ्या द्रविड यांनी १६४ टेस्ट, ३४४ वनडे आणि एकमेव टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्रविड यांच्या नावावर २४,१७७ धावा आहेत. तंत्रशुद्धतेचा वस्तुपाठ असं द्रविड यांच्या फलंदाजीचं वर्णन केलं जातं. आयपीएल स्पर्धेत त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर द्रविड यांनी U19 संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने U19 वर्ल्डकपवर नाव कोरलं. बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचं प्रमुखपदही भूषवलं.पद्मविभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्येही त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं.