Indian cricket team play warm up match in Dubai : येत्या काही दिवसांत टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या तयारीला सुरुवात करेल. ही स्पर्धा पुढील महिन्यातील १९ तारखेपासून पाकिस्तान आणि यूएईमध्ये सुरू होणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघ दुबईमध्ये आपले सामने खेळणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे, जी तयारीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असेल. पण केवळ ही मालिकाच नाही तर स्प्रर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया दुबईत एक सामनाही खेळणार आहे, जो संघासाठी सराव सामना असणार आहे.

टीम इंडिया दुबईत एक सराव सामना खेळणार –

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दुबईला पोहोचल्यानंतर भारतीय संघ सराव सामनाही खेळणार आहे. हा सामना कधी आणि कोणत्या संघासोबत होणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही. आयसीसीकडून भारतासह सर्व संघांसाठी सराव सामने आयोजित केले जात आहेत की टीम इंडियाची तयारी पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय आपल्या स्तरावर व्यवस्था करत आहे की नाही हे देखील सध्या स्पष्ट नाही. या सामन्यासह टीम इंडिया केवळ कौशल्याच्या पातळीवरच नव्हे तर परिस्थितीच्या पातळीवरही स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल.

भारतासाठी इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका महत्त्वपूर्ण –

भारत-इंग्लंड मालिका संपुष्टात येण्यापासून ते स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळात फारच कमी कालावधी असल्याने टीम इंडियाला एकच सराव सामना खेळणे शक्य आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. ही मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून मालिकेतील शेवटचा वनडे सामना १२ फेब्रुवारीला होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वडोदरात, दुसरा कटकमध्ये आणि तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतरच टीम इंडिया दुबईला रवाना होणार आहे.

हेही वाचा – Wankhede Stadium : क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमची काय आहेत वैशिष्ट्यं? जाणून घ्या

टीम इंडियाचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने –

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, तर टीम इंडिया २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध गट फेरीतील पहिला सामना खेळणार आहे. या गटात बांगलादेश व्यतिरिक्त टीम इंडियासह पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघही आहेत. २३ फेब्रुवारीला दुबईत सर्वात महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना २ मार्चला होणार आहे. जर भारतीय संघ उपांत्य फेरीत आणि नंतर फायनलमध्ये पोहोचला तर हे दोन्ही सामने दुबईत खेळवले जातील.

Story img Loader