‘‘अपयश हा यशातील महत्त्वाचा भाग असतो, नव्हे अपयश हाच यशाचा जन्मदाता असतो,’’ या क्रीडा मानसशास्त्रज्ञ रुडी वेबस्टर यांच्या विचारांची आता भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला नितांत आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभव भारतीय क्रिकेटरसिकांना जिव्हारी लागला नव्हता. कारण आफ्रिकेची खेळपट्टी, त्यांचे तेजतर्रार गोलंदाज आणि वातावरण यांच्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, याची सर्वानाच पक्की जाणीव होती. त्यामुळेच तो धक्का अनपेक्षित मुळीच नव्हता. परंतु न्यूझीलंड दौऱ्यावरील एकापाठोपाठ एक बसलेल्या धक्क्यांमुळे भारतीय संघाची एखाद्या ठिकरीप्रमाणे अवस्था झाली. त्यामुळेच आता कसोटी मालिकेत किवींचा मुकाबला करताना दडपण अधिक आहे.
भारताने परदेशात विजय मिळवल्याच्या घटनेला आता येत्या काही महिन्यांत तीन वष्रे पूर्ण होतील. वेस्ट इंडिजविरुद्ध २०११मध्ये भारताने तीन कसोटी सामन्यांची ती मालिका १-० अशी जिंकली होती. ती वगळल्यास परदेशातील वेगवान खेळपट्टय़ांवरील भारताच्या पराभवाची रडकथा मात्र कायम पाहायला मिळाली. भारतात झालेल्या काही मालिकांमध्ये फिरकी अस्त्रांच्या बळावर मर्दुमकी गाजवून जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर आपला संघ विराजमान आहे. पण देश-परदेश हा फरक मात्र भारताच्या कामगिरीतून सहज स्पष्ट होतो. न्यूझीलंडला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आरामात धूळ चारू, या आविर्भावात असलेल्या भारताला एकही सामना जिंकता आला नाही. याच रणांगणावर पुढील वर्षी विश्वविजेतेपदाचा रणसंग्राम आहे, याची धोनीसेनेला पुरती कल्पना होती. त्यामुळेच धोनीला न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाचे दु:ख अधिक तीव्रतेने बोचले. गोलंदाजांनी डोके वापरून गोलंदाजी करावी, असे कडवे बोल सुनवायलाही त्याने मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेला सामोरे जाताना वातावरण मुळीच अनुकूल नाही. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने चांगली कामगिरी केली होती. ती सकारात्मकता भारताच्या नक्कीच पाठीशी आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या जोहान्सबर्गच्या पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने शतके झळकावली होती. झहीर खान, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने टिच्चून गोलंदाजी केली होती. फॅफ डय़ू प्लेसिस आणि ए बी डी व्हिलियर्स यांनी सामन्याचे पारडे आफ्रिकेकडे झुकवणारी झुंजार भागीदारी केली नसती तर हा सामना भारताला जिंकता आला असता. दुसऱ्या कसोटीत मुरली विजय आणि पुजाराने चांगली फलंदाजी केली, तर अजिंक्य रहाणेने दोन्ही डावांमध्ये अर्धशतके झळकावून मधल्या फळीतील आपले कसोटी स्थान निश्चित केले. परंतु डेल स्टेनची वेगाने धडाडणारी गोलंदाजी आणि जॅक कॅलिसच्या फलंदाजीपुढे भारताचा निभाव लागला नाही. ती कसोटी भारताने गमावली आणि मालिकाही. २०११-१२ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ०-४ अशा फरकाने पत्करलेल्या पराभवाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.
व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर हे फलंदाज इतिहासजमा झाले आहेत. वीरेंद्र सेहवागचे आंतरराष्ट्रीय क्षितिजावर तळपणे कठीण दिसते आहे, तर गौतम गंभीरचे झगडणे त्याला कितपत साथ देईल, हे प्रश्नचिन्ह आहे. परंतु मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या ताज्या दमाच्या खेळाडूंनी त्यांची जागा आता घेतली आहे. आर. अश्विनचे परदेशातील अपयश झाकणे अशक्यप्राय आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा भारतात आत्मविश्वासाने खेळले, परंतु परदेशात मात्र चाचपडत खेळताना दिसले. ही उणीव ते न्यूझीलंड भूमीवर दूर करण्याचा प्रयत्न करतील. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजापैकी एकालाच संधी मिळू शकेल, हे पाहता जडेजाचे पारडे जड दिसते आहे. मधल्या फळीत समर्थपणे फलंदाजी करू शकणारा फॉर्मात असलेला अंबाती रायुडू हा आणखी एक पर्याय भारताकडे उपलब्ध असेल. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा झहीर खान, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि नव्या ईश्वर पांडेवर अवलंबून आहे.
२००८-०९मध्ये भारताने न्यूझीलंडचा अखेरचा दौरा केला होता. ती मालिका भारताने १-० अशी जिंकली होती. त्यानंतर २०१२मध्ये भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत निभ्रेळ यश संपादन केले होते. हे सारे चित्र भारतासाठी अनुकूल असले तरी सध्याच्या न्यूझीलंडच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. भारताला कसोटी मालिकेत सामोरे जाण्यापूर्वी किवींनी वेस्ट इंडिजला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असे हरवले आहे, याची भारताला पक्की जाणीव आहे. कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलम, केन विल्यम्सन, रॉस टेलर आणि कोरे अँडरसन अतिशय फॉर्मात आहेत. वेगवान गोलंदाज टिम साऊदीनेही आपला हिसका भारतीय फलंदाजांना दाखवला आहे. फिरकी गोलंदाज ईश सोधीविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
भूतकाळाचा आढावा घेतल्यास सोपा वाटणारा हा पेपर वर्तमानातील पाश्र्वभूमीवर भारतासाठी अधिक कठीण भासत आहे. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर धोनी म्हणाला होता, ‘‘पराभव हा वाईटच असतो. याबाबत काय बोलणार? दु:खाचे मोजमाप करता येत नाही.’’ हेच कटू दु:ख बाजूला सारून आता धोनीला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे सज्ज व्हावे लागणार आहे.