भारतीय फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी दुसऱ्या बाळाचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी राधिका धोपावकरने काही तासांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अजिंक्य रहाणे स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यानंतर रहाणे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अजिंक्य रहाणेने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणाला, “आज (बुधवारी ५ ऑक्टोबर) सकाळी राधिका आणि मी आमच्या बाळाचं जगात स्वागत केलं. राधिका आणि बाळ दोघंही सुखरुप आहेत. तुमच्याकडून मिळालेलं प्रेम आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद!”
अजिंक्य रहाणेच्या या पोस्टवर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. “तुझे खूप खूप अभिनंदन. आपल्या संघाची सर्वात लहान आकाराची जर्सी तयार करण्यास सांगितले आहे. ज्याच्या मागे रहाणे असे लिहिलेले असेल.” तर क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारानेही यावर कमेंट केली आहे. “तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि छोट्यासाठी प्रेम आणि आशीर्वाद,” असे चेतेश्वर पुजारा म्हणाला.
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर हे दोघेही २६ सप्टेंबर २०१४ रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांनी मराठी रितीरिवाजानुसार लग्न केलं. लग्नानंतर ५ वर्षांनी २०१९ मध्ये राधिकानं मुलगी आर्याला जन्म दिला होता. आर्याचा जन्म ५ ऑक्टोबर २०१९ रोजी झाला होता. त्यानंतर आता त्याच्या दुसऱ्या मुलाचा जन्मही ५ ऑक्टोबर रोजी झाला आहे.