भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या कुटुंबातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अजिंक्यची आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचे निधन झाले आहे. अजिंक्यचे वडील मधूकर रहाणे यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अजिंक्यने आपल्या आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ही इच्छा अपूर्णच राहिली आहे. संगमनेर येथे राहणाऱ्या अजिंक्यच्या आजीने वयाची शंभरी गाठली होती.
अजिंक्यची इच्छा राहिली अपूर्ण
काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये संगमनेरला कधी जाणार, असा प्रश्न अजिंक्यला विचारण्यात आला होता. त्यावेळी अजिंक्य म्हणाला ”माझी आजी संगमनेरला असते. तिला भेटायची माझी इच्छा आहे. करोनाची परिस्थिती सुधारली, की लगेचच मी माझ्या आजीची भेट घेण्यासाठी संगमनेर येथे जाईन.”
तब्बल तीन दशकांचा दुष्काळ संपवत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध गाबा खेळपट्टीवर विजय नोंदवला. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर खेळवण्यात आला. या मैदानावर मागील 32 वर्षांपासून भारताला विजय मिळवता आला नव्हता. मात्र, अंजिक्य रहाणेच्या संघाने हा इतिहास घडवला. शिवाय, ही मालिकाही 2-1 अशी नावावर केली.
या पराक्रमानंतर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावातील लोकांनी आणि अजिंक्यच्या घरातील सदस्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला होता. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे नाशिक पुणे महामार्गालगतचे गाव आहे. अजिंक्य रहाणेचे हे मूळ गाव. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर त्याच्या आजीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला. अजिंक्य आपल्या आजीचा अत्यंत लाडका होता. गावातील त्याच्या बंगल्याचे नावही झेलू आहे.