विराट कोहली या नावाला आज आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात बरच वजन प्राप्त आहे. फार कमी कालावधीतच आपल्या दमदार खेळीने भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी विराजमान झालेल्या विराटला पाहून अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. त्याच्याविषयी काही दिग्गज खेळाडूंची मतंही अशीच आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील माजी खेळाडू ऑल्विन कालिचरण यांनी विराटमध्ये आपल्याला सर व्हिव रिचर्ड्स या महान खेळाडूची झलक दिसते, असे लक्षवेधी वक्तव्य केले. रिचर्ड्स ज्यावेळी संघाचे कर्णधार होते तेव्हा त्यांच्यामध्ये असणारे गुणविशेष आणि विराटमध्ये असणारे गुणविशेष यांमध्ये बरेच साधर्म्य असल्याचे त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. उत्तरप्रदेशमधील पीलीभीत येथे एका स्पर्धेसाठी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.

‘त्या दोघांचा (विराट आणि रिचर्ड्स) वावर जवळपास एकसारखाच आहे. मी सहसा खेळाडूंमध्ये तुलना करत नाही. मला ते आवडतही नाही. पण, कोहली हासुद्धा रिचर्ड्स यांच्याइतकाच निर्दयी आहे’, असे ते म्हणाले. १९८४ ते १९९१च्या काळात रिचर्ड्स यांनी वेस्ट इंडिज संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. जवळपास ५० कसोटी मालिकांमध्ये वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या या खेळाडूने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत संघाला कोणत्याच मालिकेत पराभूत होऊ दिले नव्हते. एक पट्टीचे फलंदाच म्हणून रिचर्ड्स ओळखले जायचेच. पण, खेळपट्टीवर असताना आक्रमक आणि तापट स्वभावासाठीसुद्धा ते ओळखले जायचे.

पॅरालिम्पिकमधल्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्याचा गौरव, जाणून घ्या कोण आहेत मुरलीकांत पेटकर?

रिचर्ड्स यांच्या याच स्वभाविषयी सांगत कालिचरण यांनी थेट विराट कोहली आणि त्यांच्यामध्ये साधर्म्य आढळणाऱ्या गोष्टी सर्वांसमोर आणल्या. ‘रिचर्ड्स आणि त्यांच्यात बरेच गुणविशेष एकसारखे आहेत. तो (विराट) एक यशस्वी कर्णधार आहे. एक फलंदाज म्हणून्ही तो अद्वितीय कामगिरी करतो. त्याची धावांची भूक कधीच भागत नाही. मुळात त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचीही प्रशंसा करावी तितकी कमीच आहे’, असेही कालिचरण यांनी सांगितले. विराटच्या कर्णधारपदामुळे एक वेगळ्याच युगाचा प्रारंभ झाल्याचेही त्यांनी या मुलाखतीत नमूद केले.

Story img Loader