भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या सर्वोत्तम लयीत आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरोधात झालेल्या सामन्यात पांड्याने अष्टपैलू कामगिरी करत चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या तर दुसरीकडे संघ अडचणीत असताना ४० धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. भारताने चार गडी राखून हा सामना जिंकला. आयपीएलमध्येही हार्दिकने गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना संघाला पहिल्याच हंगामात जेतेपद मिळवून दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिक पांड्या आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. मुलाखतींमध्येही अनेकदा तो हातचं काही राखून न ठेवता उत्तरं देत असतो. नुकतंच त्याने मांकडिंगवरुन सुरु असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. भारतीय महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्माने इंग्लंडच्या शार्ली डीनला धावबाद केल्यानंतर हा वाद नव्याने निर्माण झाला होता.

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर PCB चे प्रमुख रमीज राजा यांचं ट्वीट, म्हणाले “खेळ कधी क्रूर आणि अन्यायकारक…”

“मला वाटतं आपण नॉन स्ट्राइकरला धावबाद करण्यासंबंधी इतका वाद निर्माण करण्याची गरज नाही. हा नियम आहे, मग खड्ड्यात गेली खिलाडूवृत्ती. जर नियम आहे तर त्याचं पालन झालं पाहिजे हे इतकं सोपं आहे. मला याच्यात काहीच अडचण नाही. जर मी रेषेच्या पुढे गेलो असेन आणि धावबाद केलं तर ठीक आहे. ही माझी चूक आहे,” असं हार्दिकने ‘ICC Review’ च्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.

विश्लेषण: ‘डेड बॉल’वरुन पाकिस्तानची रडारडी; पण ‘डेड बॉल’ म्हणजे नेमकं काय? तो कधी घोषित करतात? विराटच्या तीन धावा ग्राह्य का धरल्या?

हार्दिकने यावेळी सर्वात छोट्या प्रकारात फलंदाजांच्या जोड्या लावणं हे थोडं अतिशयोक्ती असल्याचं म्हटलं आहे. “एखाद्या फलंदाजासोबत जोडी लावणं मला जमत नाही. मी ज्या क्रमांकावर किंवा परिस्थितीत फलंदाजी करतो तिथे या गोष्टीला अर्थ नाही. तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्यांसाठी ते आहे. माझ्यासाठी ती परिस्थिती महत्त्वाची असते. अनेकदा मी गोलंदाजांवर तुटून पडतो, पण जर परिस्थिती तशी नसेल तर मी उगाच संघाला अडचणीत टाकत नाही,” असं हार्दिकने सांगितलं आहे.

चुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद!

“मर्यादित षटकांच्या सामन्यात तुमच्यासमोर फलंदाजी करताना जोडीदार कोण असेल याची तुम्हाला निवड करण्याची कोणतीच संधी उपलब्ध नसते. कारण खेळच इतक्या कमी षटकांचा आणि कालावधीचा असतो की तुमच्याकडे जपून खेळणं वैगेरे असे पर्यायच नसतात. मला ही अतिशयोक्ती वाटते. एकदिवसीय किंवा कसोटीमध्ये ठीक आहे, पण टी-२० मध्ये हे शक्य नाही,” असं हार्दिकने म्हटलं आहे.

हार्दिकने यावेळी भविष्यातील आपल्या वाटचालीवर भाष्य करताना सांगितलं की “जेव्हापासून मी पुनरागमन केलं आहे, तेव्हापासून आपल्यातील सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. मला महान नाही पण उत्कृष्ट खेळाडू व्हायचं आहे. जर मला काही मिळवायचं असेल तर ती कामगिरी नाही तर उत्कृष्टता असेल”.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer hardik pandya says hell with spirit of game over running non striker out sgy