इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर करोनाचं संकट आलं आहे. इंग्लंडमध्ये असणाऱ्या भारतीय संघाच्या एका खेळाडूला करोनाची लागण झाली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या खेळाडूला सध्या त्याच्या नातेवाईकाच्या घऱी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. इंडियन एक्स्पेसच्या वृत्तानुसार, नंतर तो पुन्हा संघात परतेल अशी अपेक्षा आहे. गुरुवारी डरहॅममध्ये भारतीय संघ खेळाडूविना बायो बबलमध्ये परतणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या खेळाडूला घसा खवखवण्याचा त्रास जाणवत होता. यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली असता पॉझिटिव्ह आली. या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे.
बुधवारी, मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची कोलकात्यात भेट घेतली. पण या बैठकीत झालेल्या चर्चेची कोणतीही माहिती त्यांनी बाहेर येऊ दिली नाही.
इंग्लंड क्रिकेट संघावर करोनाचं सावट असतानाच भारतीय खेळाडूलाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. इंग्लंड संघ पाकिस्तानविरोधात एकदिवसीय मालिका पार पडली. मात्र पहिल्या एकदिवसीय सामन्याआधीच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने संघातील सात सदस्यांना करोनाची लागण झाली असून यामध्ये तीन खेळाडू आणि चार कर्मचारी असल्याची माहिती दिली होती. यामुळे इंग्लंड संघात बदल करण्यात आले असून बेन स्टोक्सकडे कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
इंग्लंडने ३-० ने पाकिस्तानचा पराभव करत मालिका जिंकली आहे. मात्र बायो बबल सुरक्षा असतानाही करोनाने शिरकाव कसा केला असा प्रश्न सर्वांना सतावत आहे. पाकिस्तान मालिकेआधी श्रीलंकेने इंग्लंडचा दौरा केला होता. पण मायदेशी परतल्यानंतर त्यांनाही करोनाचा सामना करावा लागला. यामुळे भारताविरोधातील एकदिवसीय मालिका पुढे ढकलावी लागली. १३ जुलै रोजी होणारी ही मालिका १८ जुलैला होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय खेळाडूंना बायो बबलमधून बाहेर पडत वेळ घालवण्याची परवानगी देण्यात आली होती. २३ जूनला चॅम्पियनशिपची फायनल झाली. बीसीसीआयनेही परवानगी देताना खेळाडू आणि इतर कर्मचारी जुलैच्या मध्यात पुन्हा बायो बबलमध्ये परततली असं स्पष्ट केलं होतं. भारतीय संघ इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.