Mithali Raj Retires from International Cricket : भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज आणि अनुभवी खेळाडू असलेल्या मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून मितालीने याबाबत माहिती दिली. ३९ वर्षीय मिताली एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत होती. मिताली गेल्या २३ वर्षांपासून क्रिकेटशी निगडीत होती.
जून १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. तिने २३२ सामन्यांमध्ये ५०.६८ च्या सरासरीने सात हजार ८०५ धावा केल्या आहे.
तिच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यापूर्वी, २००५ मध्ये आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जेव्हा भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता तेव्हाही मिताली भारतीय संघाची कर्णधार होती. तिने यंदाच्या महिला विश्वचषकातही भारताचे कर्णधारपद भूषवले होते. मितालीने आतापर्यंत सहा विश्वचषकांमध्ये सहभाग घेतलेला आहे. तिच्या नावावर महिला क्रिकेटमधील अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीमध्ये ती सातव्या स्थानवर होती.
‘इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे ही एक सन्मानाची गोष्ट होती. त्यामुळे मला एक चांगली व्यक्ती होण्यास मदत झाली. भारतीय महिला क्रिकेटच्या विकासामध्ये मी योगदान देऊ शकले, याचा मला आनंद आहे ‘, असे मिताली आपल्या निवृत्तीच्या नोटमध्ये म्हणाली आहे. याशिवाय तिने संघातील सर्व सहकारी, बीसीसीआय, बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी आणि सर्व चाहत्यांचेही आभार मानले आहेत.