भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज मोहम्मद शमी सध्या चांगलाच अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. फसवणूक आणि घरगुती हिंसेचा आरोप शमीच्या पत्नीने काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर केला. तेव्हापासूनच हे आरोप- प्रत्यारोपांचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. शमीच्या पत्नीने त्याने इतर मुलींशी केलेच्या अश्लील चॅट्सचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर आता त्याने आपली बाजू मांडली आहे. पत्नीने लावलेले सर्व आरोप फेटाळत हा आपल्याविरोधात रचलेला कट असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पत्नीने केलेले आरोप खोटे असल्याचं सांगत त्याने काही दिवसांपूर्वीचे पत्नीसोबतचे फोटोही सर्वांना दाखवले आहेत. होळीच्या निमित्ताने रंग खेळतानाचे फोटो दाखवत त्या दिवसापर्यंत आमच्या नात्यात सर्व गोष्टी योग्य पद्धतीने चालल्या होत्या. सारंकाही आलबेल होतं. पण, आता मात्र आपल्यावर हे आरोप का करण्यात येत आहेत हेच कळत नसल्याचा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

वाचा : ‘तिच्यासाठी मोहम्मद शमीनं आत्महत्येचाही प्रयत्न केला’ पत्नीचा आणखी एक खळबळजनक दावा

‘माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न’
‘त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून, यामागे नेमका काय हेतू आहे हेच मला कळत नाहीये. जोपर्यंत मला स्वत:ला ते कारण ठाऊक होत नाही तोपर्यंत या साऱ्यामागे नेमकं काय कारण आहे हे मी सांगूच शकत नाही. माझी प्रतिमा मलिन करण्याचाच हा प्रयत्न असावा. आमच्या नात्याविषयी सांगावं तर, आम्ही होळीचा सण एकत्रच साजरा केला. दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून मी परतल्यानंतर आम्ही खरेदीसाठीसुद्धा गेलो होतो. मुख्य म्हणजे तिनेही होळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर मी जेव्हा धरमशालाला गेलो तेव्हा या सर्व प्रकरणाने तोंड वर काढलं’, असं शमी म्हणाला.

सध्याच्या घडीला शमीची पत्नी त्याच्या फोनचंही उत्तर देत नाहीये. पण, सासऱ्यांशी आपलं बोलणं झालं असून, या साऱ्यावर लवकरच तोडगा काढू, असं शमी म्हणाला.

काय होतं प्रकरण?
काही दिवसांपूर्वीच शमीचे विवाहबाह्य अनैतिक संबध असल्याचे आरोप करत त्याची पत्नी हसिन हिनं फेसबुवर काही फोटो आणि अश्लिल चॅट्सचे स्क्रिन शॉर्ट टाकत जगाला याचा पुरावा दिला होता. हसिनच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. एक नाही तर अनेक महिलांशी शमीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिने केला होता.

Story img Loader