टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा मैदानात आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. वन-डे क्रिकेटमध्ये दोन द्विशतकं लगावण्याचा विक्रम सध्या रोहित शर्माच्या नावे आहे. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे सोशल मीडियावरही रोहितची सध्या चांगली घोडदौड सुरु आहे. मात्र मैदानात भल्याभल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणारा रोहित गणितात कच्चा असल्याचं एका व्हिडीओतून समोर आलंय.

१९ सप्टेंबरला रोहित शर्माच्या ट्विटर अकाऊंटने ८० लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला. या आनंदात रोहितने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांचे आभार मानले. मात्र या व्हिडिओतील एक चूक त्याच्या लक्षात आली नाही. चाणाक्ष नेटिझन्सनी यावरुन रोहितची चांगलीच फिरकी घेतली.

या व्हिडिओत रोहित एका फळ्यावर ८० लाख ही संख्या आकड्यांमध्ये लिहितो. मात्र आकड्यात ही संख्या लिहून झाल्यानंतर रोहितने त्यापुढे इंग्रजीतलं ‘M’ हे अक्षर काढलं. ज्याचा अर्थ ८० लाख मिलियन असा होतो. यावरुन नेटिझन्सनी रोहितची चांगलीच खिल्ली उडवली. काहींनी खास ट्विट करुन रोहितला पुन्हा एकदा गणिताचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत २१ कसोटी, १६८ वन-डे आणि ६३ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने ७ अर्धशतके आणि २ शतकांसह ११८४ धावा काढल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये रोहितच्या नावे ६०३३ धावा जमा असून, यात ३४ अर्धशतके आणि १४ शतकांचा समावेश आहे. टी-२० सामन्यांमध्येही रोहितने आतापर्यंत १३७३ धावा काढल्या आहेत.

Story img Loader