टीम इंडियाचे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक आर्थिक अडचणींचा सामना केला आहे. हे दोन्ही खेळाडू बॅट उधार घेऊन क्रिकेट खेळलेत. इतकेच नव्हे, तर दोन्ही भाऊ पोट भरण्यासाठी मॅगी खात असत. पण आज हार्दिक आणि कृणाल हे खूप यशस्वी क्रिकेटपटू आहेत. टीम इंडियामध्ये प्रवेश आणि आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरीमुळे दोन्ही खेळाडूंनी मोठी उंची गाठली आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, कृणाल आणि हार्दिक पंड्या यांनी मुंबईत एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे, ज्याची किंमत ३० कोटी रुपये आहे.  हा फ्लॅट ८ बीएचके असल्याचे समजत आहे. पंड्या बंधूंनी रुस्तमजी पॅरामाउंट, मुंबई येथे हा फ्लॅट खरेदी केला आहे. बॉलीवूड अभिनेते टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी देखील या सोसायटीत राहतात.

हेही वाचा – ‘‘BCCI मला धमकी देतंय, की….”, दिग्गज क्रिकेटपटू हर्शेल गिब्जचे गंभीर आरोप

डीएनएच्या बातमीनुसार, हार्दिक आणि कृणाल पंड्याच्या घरात जिम, गेमिंग झोनही आहे. तसेच या आलिशान फ्लॅटमध्ये खासगी जलतरण तलावही आहे. एवढेच नाहीस तर पंड्या बंधूंच्या अपार्टमेंटमध्ये एक खासगी थिएटर देखील आहे. लवकरच पंड्या बंधू बडोदाहून मुंबईला शिफ्ट होऊ शकतात. एकेकाळी प्रति सामन्याला ४०० ते ५०० रुपये कमावणाऱ्या पंड्या बंधूंची ही प्रगती पाहून सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे.

पंड्या बंधूचे श्रीलंकेत निराशाजनक प्रदर्शन

हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचा भाग होते. कृणाल पंड्या दोन एकदिवसीय सामन्यात विकेट घेऊ शकला आणि त्याने फलंदाजीने ३५ धावांचे योगदान दिले. हार्दिक पंड्याने एकदिवसीय मालिकेत फक्त १९ धावा केल्या. टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यानंतर, कृणाल पंड्या करोना पॉझिटिव्ह आढळला, त्यानंतर त्याच्या संपर्कात असलेले इतर ८ खेळाडूही मालिकेबाहेर गेले. हार्दिक पंड्याही त्यांच्यामध्ये होता. ९ खेळाडूंना वगळल्यामुळे भारतीय संघाकडून ५ खेळाडूंनी टी-२० मालिकेत पदार्पण केले. याचा फायदा श्रीलंकेने घेतला आणि टी-२- मालिका २-१ने जिंकली.

Story img Loader