Shane Warne Death Reason: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे एप्रिल २०२२ मध्ये थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले होते. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे सांगितले जात असले तरी, या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. वॉर्नच्या निधनाबाबत नुकतेच काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. एका अहवालानुसार, वॉर्नच्या मृत्यूमागे भारतीय औषध असू शकते, असे या प्रकरणाच्या चौकशीत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने उघड केले आहे.
शेन वॉर्नचा मृत्यू झाला त्याठिकाणी एका पोलीस अधिकाऱ्याला कामाग्राची एक बाटली सापडली होती. कामाग्रा हे इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्यांसाठी वापरले जाणारे औषध आहे. या औषधात व्हायग्रासारखेच घटक असतात परंतु हृदयरोग असलेल्या लोकांनी ते वापरू नये असे म्हटले जाते. याबाबत लंडनस्थित डेली मेल या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दावा केला की, काही वरिष्ठ लोकांनी त्यांना त्या ठिकाणाहून औषध हटवण्यास सांगितले होते. कारण त्यांना वॉर्नसारख्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाच्या मृत्यूची बातमी अशा प्रकारे बाहेर येऊ नये असे वाटत होते.
“आम्हाला आमच्या वरिष्ठांनी कामग्राची बाटली हटवण्याचे आदेश दिले होते. हे आदेश वरून आले होते आणि मला वाटते की, ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी होते. कारण, त्यांना त्यांच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचा असा शेवट होऊ नये असे वाटत होते”, असे या पोलीस अधिकाऱ्याने सांगितेल.
हा अधिकारी पुढे म्हणाला की, “अधिकृत अहवालात असे म्हटले आहे की, शेन वॉर्नला हृदयविकाराचा झटका आला होता. हा झटका कशामुळे झाला असावा याबद्दल इतर कोणतीही माहिती नव्हती. कामग्राची पुष्टी करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही कारण हा एक संवेदनशील विषय होता. या सर्वामागे अनेक शक्तिशाली अदृश्य हात होते.”
“तिथे कामाग्राती एक बाटली होती, परंतु त्याने त्यातील किती औषध घेतले हे आम्हाला माहित नाही. घटनास्थळी उलट्या आणि रक्ताचा डबा देखील होता, परंतु आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही कामग्राची बाटली हटवली”, असे हा अधिकारी शेवटी म्हणाला.
वॉर्नच्या मृत्यूनंतर सुरत थानी रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात, वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असे म्हटले होते. त्यामुळे शेन वॉर्नच्या मृत्यूमागे कोणत्याही प्रकारच्या कट असल्याची शक्यता नाकारण्यात आली होती.