इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामामध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकून उमरान मलिक सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता. आयपीएल हंगामात त्याने १४ सामन्यांत २२ बळी घेऊन भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी आणि नंतरच्या आयर्लंड दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले. यापुढेही आपल्याला भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी उमरान मलिकने जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने आपल्या या तयारीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात वेगवान गोलंदाज असलेल्या उमरानेने आगामी सामन्यांसाठी तयारी सुरू केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जीममध्ये हातांचा व्यायाम करताना दिसत आहे. तितक्यात विजेच्या वेगाने एक गुढ प्रकाश किरण त्याच्याजवळून जाताना दिसते. त्याच्या वेगाने उमरानही चकित होतो. आपल्या या व्हिडीओला उमरानने ‘फास्टर दॅन फास्ट’ असा हॅशटॅग दिला आहे. त्यामुळे त्याचे चाहते उत्साहित झाले आहेत.
सर्वात वेगवान काय असू शकते? याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. उमरान मलिक भविष्यात आपल्या गोलंदाजीची शैली बदलण्याचा विचार करत आहे का? तो शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे का? असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
उमरान मलिक सातत्याने ताशी १५० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करत आहे. भविष्यात ताशी १६१ किलीमीटर वेगाने चेंडू फेकून शोएब अख्तरचा विक्रम मोडू शकतो का? हे बघण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.