भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जवरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य करत आयसीसीच्या नियमांचा आदर केला पाहिजे असं मत नोंदवलं आहे. वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे असलेले विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरले असून त्यावरुन वाद सुरु झाला आहे. आयसीसीने बीसीसीआयकडे धोनीला हे ग्लोव्ह्ज वापरु नये अशी सूचना कऱण्याची विनंती केली आहे.

बायचुंग भुतिया याने धोनीचं कौतुक केलं असून चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्यांचंही विशेष कौतुक केलं आहे. पण खेळात नियमापेक्षा खेळाडू मोठा नसतो असंही त्याने सांगितलं आहे. बायचुंग भुतियाने सांगितलं आहे की, ‘मला वाटतं धोनीचा निर्णय़ कौतुकास्पद आहे, पण खेळात नियमांचं पालन करणंही तितकंच महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. जर नियम परवानगी देत नसतील तर मला वाटतं धोनीने विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरु नयेत’.

#DhoniKeepTheGlove : आयसीसीचे नियम काय सांगतात

धोनीच्या ग्लोव्ह्जचा वाद; BCCI चे प्रशासक म्हणतात…

‘एखादा खेळाडू किती मोठा आहे याला महत्त्व नाही, पण नियमाचं पालन केलंच पाहिजे’, असंही बायचुंग भुतिया याने सांगितलं आहे. चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना त्याने म्हटलं की, ‘मी लोकांच्या भावना समजू शकतो. आपण सगळेच देशभक्त आहोत. पण याचवेळी खेळाचे नियम पाळणंही महत्त्वाचं आहे. धोनीलाही नियम नक्की माहित असतील’. ‘आपण देशभक्त आणि भावनिक असू शकतो पण दिवसाच्या शेवटी नियमापेक्षा मोठं कोणी नाही’, असं मत बायचुंग भुतियाने नोंदवलं आहे.

काय आहेत आयसीसीचे कपडे व उपकरणांच्या वापराबाबतच्या अटी व शर्ती:

यात असं नमूद केलंय की, “विकेट किपरच्या ग्लोव्हजवर उत्पादकाची दोन डिझाईन वा लोगो वापरण्यास अनुमती आहे. दिसून येतील असे कुठलेही लोगो जे मंजूर केलेले नाहीत ते वापरता येणार नाहीत.” आयसीसी केवळ राष्ट्रीय लोगो, व्यापारी लोगो, इव्हेंट लोगो, उत्पादकाचा लोगो, खेळाडूच्या बॅटवरील लोगो, चॅरिटी किंवा अव्यापारी लोगो किटवर प्रिंट करण्यास अनुमती देते. लष्कराचं बलिदान चिन्ह असलेला लोगो या यादीत बसत नसल्यानं आयसीसीनं या लोगोवर आक्षेप घेतला आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार या अटी व शर्तींमध्ये न बसणारे लोगो वापरण्यास कडक बंदी आहे. तसेच असं काही खेळाडुंनी केलेलं आढळून आल्यास व आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यास सामनाधिकाऱ्याला सदर खेळाडूला, जोपर्यंत उल्लंघन केलेली बाब सुधारत नाही तोपर्यंत योग्य वाटल्यास मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार आहे. कार्यकारी समितीच्या परवानगीखेरीज कुठल्याही प्रकारचे संदेश वेगवेगळ्या पट्ट्यांच्या वगैरे कुठल्याही माध्यमातून देता येणार नाहीत असेही आयसीसीचे नियम सांगतात.

धोनीच्या ग्लोव्ह्जचा वाद; BCCI चे प्रशासक म्हणतात…
धोनीच्या ग्लोव्ह्जवरील चिन्ह काढून टाकावे असे आदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिले असून यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रशासक विनोद राय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader