अंतिम सामन्यात गतविजेत्या अफगाणिस्तानचे आव्हान

युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समन्वय असलेला भारतीय फुटबॉल संघ नववर्षांत विजयी सप्तरंगांची उधळण करण्यासाठी सज्ज झाला आहे. फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील निराशाजनक कामगिरीमुळे खचलेल्या भारतीय संघाने दक्षिण आशियाई फुटबॉल स्पध्रेत (सॅफ) जोरदार मुसंडी मारून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पध्रेचे सर्वाधिक सहा जेतेपदे नावावर असलेल्या भारतासमोर जेतेपदासाठी गतविजेत्या अफगाणिस्तानचा अडथळा आहे. रविवारी येथील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

२०१३ साली नेपाळमध्ये रंगलेल्या सॅफ स्पध्रेत अफगाणिस्तानने २-० अशा फरकाने भारताला नमवून ऐतिहासिक कामगिरी केली होती. २०११च्या पराभवाची परतफेड अफगाणिस्तानने या निकालातून केली होती. सलग तिसऱ्या सॅफ स्पध्रेच्या अंतिम फेरीत उभय संघ समोरासमोर आल्याने यंदा कोण बाजी मारेल याची उत्सुकता लागली आहे. हे दोन्ही संघ आत्तापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले असून भारताने तीन विजय मिळवले आहेत. अफगाणिस्तानला एका विजयावर समाधान मानावे लागले, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

२०१३च्या भारतीय संघातील सध्या सुनील छेत्री, जेजे लाल्पेखलुआ, अर्नब मोंडल, सुब्राता पाल आणि रॉबिन सिंग यांचाच यंदाच्या संघात समावेश आहे. हे खेळाडू वगळता संपूर्ण संघ युवा खेळाडूंनी

भरला आहे. या स्पध्रेतील दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास अफगाणिस्तानचे पारडे जड वाटते. अफगाणिस्तानने प्रत्येक लढतीत प्रतिस्पर्धी संघाला गुडघे टेकायला भाग पाडले आहे, तर भारताला किंचित संघर्ष करावा लागला.

सामन्याची वेळ : सायंकाळी ६.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ४, स्टार स्पोर्ट्स एचडी ४

 

Story img Loader