आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील क्लब आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) यांच्यात सुरू असलेल्या भांडणामुळे आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या फुटबॉल लीगबाबत भारतीय फुटबॉलपटू साशंक असल्याचे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.
‘‘अनेक खेळाडूंनी माझ्याशी चर्चा केली. मी त्यांची नावे घेणार नाही. पण नवनवीन घडामोडींमुळे ते गोंधळलेले आहेत. ही परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत त्यांनी भाष्य करणे चुकीचे ठरेल. आयएमजी-रिलायन्स फुटबॉल लीगबाबत मीसुद्धा साशंक आहे. त्यामुळे जास्त प्रतीक्षा करण्याची माझी इच्छा नाही,’’ असे बंगळुरूतील जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स क्लबशी करारबद्ध झालेल्या छेत्रीने सांगितले.
‘‘या स्पर्धेसाठी करारबद्ध होण्यात काहीच गैर नाही. पण अस्थिरतेचे ढग दाटून आल्यामुळे पुढे काय होईल, काहीच सांगता येत नाही. अजून स्पर्धेचा आराखडा तयार करण्यात आलेला नाही. आयएमजी-रिलायन्सच्या अनेक अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली, पण त्यांनाही या लीगबाबत फारशी कल्पना नाही. मी कुणाच्याही विरोधात नाही. अनेक खेळाडू याआधीच करारबद्ध झाले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निवळण्याची वाट पाहायला हवी,’’ असेही त्याने सांगितले.

Story img Loader