चेन्नई : भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने रविवारी एमचेस जलद ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या प्रारंभिक स्तराच्या सातव्या फेरीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करत धक्कादायक निकाल नोंदवला.

१९ वर्षीय एरिगेसी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विदित गुजरातीकडून पराभूत झाला होता, मात्र त्याने जोरदार पुनरागमन केले आणि आठ फेऱ्यांनंतर तो  पाचव्या स्थानी राहिला. एरिगेसीने रविवारी सातव्या फेरीत कार्लसनला नमवले. त्याचा कार्लसनवर हा पहिला विजय आहे. एरिगेसीने निल्स ग्रँडेलियस (स्वीडन), डॅनिएल नरोदित्स्की (अमेरिका) आणि कार्लसनला नमवीत सलग तीन गेममध्ये विजय नोंदवले, तर पोलंडच्या यान-क्रिस्तोफ डूडासोबत त्याने बरोबरी साधली. एरिगेसीचे १५ गुण झाले असून उजबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसात्तोरोव्ह (१७ गुण), शखरियार मामेदयारोव्ह (अजरबैजान) व कार्लसन (दोघेही १६ गुण) आणि डूडानंतर (१५ गुण) पाचव्या स्थानी आहे.

एरिगेसी गेल्या महिन्यात ज्युलियस बेअर जनरेशन चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कार्लसनकडून पराभूत झाला होता. अन्य भारतीय बुद्धिबळपटू डी. गुकेश १२ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्याने पाचव्या फेरीत पी. हरिकृष्णावर विजय मिळवला. मात्र, सहाव्या आणि आठव्या फेरीत गुकेश अनुक्रमे अब्दुसात्तोरोव्ह आणि नरोदित्स्की यांकडून पराभूत व्हावे लागले. त्याने सातव्या फेरीत ग्रँडेलियसला नमवले. भारताचे बुद्धिबळपटू गुजराती, आदित्य मित्तल आणि हरिकृष्णा आठ फेऱ्यांनंतर अनुक्रमे दहाव्या, ११व्या आणि १५व्या स्थानी आहे.

Story img Loader