भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री Ravi Shastri यांची निवड झालेली आहे. आगामी विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर गेला महिनाभर भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण होणार यावर सावळा गोंधळ सुरु होता. त्यावर अखेर बीसीसीआयने पडदा टाकला आहे.

कर्णधार विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूंच्या इच्छेप्रमाणे शास्त्री यांना पुन्हा एकदा प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यात रवी शास्त्री भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्र सांभाळतील. त्याआधी अनेक वृत्तसंस्थाना रवी शास्त्री यांनी मुलाखत दिली आहे. यामध्ये आगामी काळात संघाची कामगिरी आणि संघात सिनीअर खेळाडूंच्या कामगिरीबद्दल शास्त्रींनी आपले विचार व्यक्त केले आहेत.

चॅम्पियन्स करंडक आणि त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात मधल्या फळीत युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनीला फारशी चांगली कामगिरी दाखवता आलेली नाही. त्यामुळे आगामी विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंचा संघात नेमकी भूमिका काय असेल यावर अनेकांना प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक आणि परदेश दौऱ्यांसाठी भारताचा फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडनेही धोनी आणि युवराजला पर्याय शोधण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं.
महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंह भारताचे एकेकाळचे आधारस्तंभ आहेत. २०१९ चा विश्वचषकाला अद्याप २ वर्ष बाकी आहेत. त्यामुळे वेळ आल्यावर त्यांच्या कामगिरीबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल. मात्र आगामी विश्वचषकात कोणत्याही भारतीय खेळाडूने संघात आपली जागा निश्चीत मानू नये. मैदानात केलेल्या कामगिरीच्या आधारावरच संघात खेळाडूंना जागा मिळेल, असंही रवी शास्त्री यांनी म्हणलं आहे.

कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, ”कोहली हा भारतासाठी महत्वाचा खेळाडू आहे, मात्र त्याला अद्याप स्वतःच्या खेळात खूप सुधारणा करण्याची गरज आहे. मी आतापर्यंत कोहलीशी बोललो नाहीये, मात्र श्रीलंका दौऱ्याआधी मला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे. याचसोबत गोलंदाजी प्रशिक्षक जहीर खान आणि फलंदाजी सल्लागार राहुल द्रविड यांच्या नियुक्तीबद्दलही शास्त्री यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ”हे दोन्ही खेळाडू दिग्गज आहेत. त्यामुळे त्यांचा सल्ला हा संघासाठी उपयोगीच ठरणार आहे. याआधीही माझ्याकडे संघाची जबाबदारी होती तेव्हाही मी राहुल द्रविड आणि जहीर खानला इतर खेळाडूंना आपले अनुभव सांगायला सांगायचो. त्यामुळे या दोघांच्याही अनुभवाचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होईल,” असं शास्त्री म्हणाले.

Story img Loader