झिम्बाब्वेमध्ये महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारतीयाकडून जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा सत्यनारायण यांना महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. हे प्रकरण उजेडात येण्यापूर्वी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पारितोषिक वितरण सोहळ्यात कृष्णन यांच्या हस्ते जसप्रीत बुमराहला सामनावीराचा धनादेश देण्यात आला होता. कृष्णा सत्यानारायण हे झिम्बाब्वे दौऱ्यातील आयटीम वर्क्स ( iTeamWorks ) या प्रायोजक कंपनीशी संबंधित आहेत. ११ जून रोजी झिम्बाब्वे क्रिकेटकडून जारी करण्यात आलेल्या माहितीपत्रकात कृष्णा सत्यनारायण व झिम्बाब्वेस्थित उद्योगपती रवी कृष्णन यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर मंगळवारी या दोघांकडून स्थानिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, कृष्णा सत्यानारायण यांनी अटकेनंतर सर्व आरोप फेटाळले असून, डीएनए चाचणी करण्याची मागणी केल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले होते.
सुरूवातीला बलात्कार प्रकरणात भारतीय खेळाडूचा समावेश असल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, झिम्बाब्वेमधील राजदूतांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना भारतीय क्रिकेटपटूला झिम्बाब्वेमध्ये अटक करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते. झिम्बाब्वेमधील भारताचे राजदूत या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली होती.