स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com
भारतीय हॉकी संघात सध्या संगीतखुर्चीचा खेळ दिसून येतोय. याचं कारण आहे, संघाच्या प्रशिक्षकांची सुरू असलेली अदलाबदली. पण संघातील महत्त्वाच्या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हा संगीतखुर्चीचा खेळ असाच सुरू राहील यात शंका नाही.
संगीतखुर्चीचा खेळ आठवतो का? कुणीतरी एक सीडी प्लेअरच्या बाजूला आणि खेळाडूंच्या दिशेने पाठ करून बसलेला असतो. गाणं सुरू असेपर्यंत खेळाडू खुच्र्याभोवती चकरा मारतात आणि कोणीतरी एक जण अचानक गाणं थांबवतो. मग सुरू होते खुर्ची पकडायची शर्यत. जशी एक-एक खुर्ची कमी होते तशी खेळाडूंची स्थान टिकवण्यासाठीची धडपड अधिक चुरशीची होते. अंतिमत: कुणीतरी एक विजेता ठरतो. पण तो पुढचा डाव मांडेपर्यंत कायम राहीलच याची शाश्वती नसते. कारण सगळी सूत्रे ही त्या कुण्या एका व्यक्तीच्या हातात असतात. तो ठरवेल तेव्हा आणि ठरवेल तोच या संगीतखुर्चीत विजयी ठरतो. या खेळाची आठवण होण्याचे कारण इतकेच की भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकांची सुरू असलेली अदलाबदली. यासाठी प्रशिक्षकाची हकालपट्टी हाच योग्य पर्याय आतापर्यंत निवडण्यात आलेला आहे. या वेळी केवळ खांदेपालट करण्यात आली, परंतु हे प्रशिक्षक भविष्यात कायम राहतील याची शाश्वती पूर्वानुभवावरून देणे धाडसाचे ठरेल. रोलँट ऑल्टमन्स यांची तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांच्या हाताखाली असलेल्या शोर्ड मिरज यांना काही महिन्यांपूर्वी पुरुष हॉकी संघाची जबाबदारी दिली. त्या वेळीच मिरज यांनी धोक्याची घंटा ओळखली होती.
महिला संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या मिरज यांच्यापुढे हे आव्हान स्वीकारण्यापलीकडे काही पर्यायच ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांनी गपगुमान ते शिवधनुष्य उचलले. सुरुवातीला त्यांनी आपल्या मर्गदर्शनाखाली संघाला विजय मिळवून दिले. मात्र पुढील आव्हानांचा अंदाज बांधण्यात ते अपयशी ठरले. या आव्हानांपकी सोप्या असलेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत भारत सुवर्णपदक जिंकेल अशी गर्जना त्यांनी केली. पण कांस्यपदकही हाती लागले नाही. एरवी रौप्यपदक घेऊन मायदेशी परतणाऱ्या पुरुष संघाला यंदा रिकाम्या हाताने परतावे लागले आणि त्वरित ‘त्या’ एका माणसाने आदेश दिला. पण या वेळी हा आदेश देताना आपल्यावर टीका होणार नाही याची काळजी घेताना फक्त खांदेपालट केली. कनिष्ठ विश्वचषक जिंकणाऱ्या पुरुष संघाचे प्रशिक्षक आणि सध्या बढती मिळालेले हरेंद्र सिंग यांना दुहेरी बढती दिली. पण ही बढती अधिक काळ टिकेल अशी अपेक्षा सध्या तरी बाळगता येईल. कारण हॉकी इंडियाच्या झालेल्या बठकीत २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत तरी हेच प्रशिक्षक कायम राखण्याचा निर्णय झाल्याचे कळते.
भारत आणि परदेशी प्रशिक्षक हे समीकरण अधिक काळ टिकलेले नाही. त्यामुळेच वर्षां-दोन वर्षांत प्रशिक्षकांच्या हकालपट्टीचे सत्र होतेच. ‘‘भारतात विशेषत: क्रीडा क्षेत्रात जेथे प्रचंड समस्या आहेत तेथे काम करणे अवघडच. याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे एके दिवशी आपली हकालपट्टी होईल, या परिस्थितीला सामोरे जाण्याची मी मानसिकता ठेवलेली. त्यामुळे जेव्हा प्रशिक्षकपद स्वीकारले तेव्हाच याची कल्पना होती,’’ ऑल्टमन्स यांची ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. मिरज यांची पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली तेव्हाच विरोधाचे सूर होते. मिरज यांच्या ऐवजी हरेंद्र सिंग यांना ही जबाबदारी का दिली नाही? असा सवाल सर्वाच्या मनात होता. हरेंद्र यांना येथील परिस्थिती मिरजपेक्षा चांगली माहीत होती. मात्र तरीही हॉकी इंडियाने मिरज यांना महिला संघाचे प्रशिक्षकपद सोडून पुरुष संघाची जबाबदारी स्वीकारायला सांगितली. आणि वर्षभराच्या आत पुन्हा मिरज यांची घरवापसी झाली. हरेंद्र सिंग यांची निवड सध्या तरी स्वागतार्ह आहे.
पण प्रशिक्षक बदलून भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली असती तर ती याआधीच व्हायला हवी होती. गेल्या दहा वर्षांत जवळपास १२ प्रशिक्षक बदलण्यात आले. खेळाडूंना या परदेशी प्रशिक्षकांसोबत जुळवून घेता येत नाही, हे कटुसत्य आहे. त्यामुळेच थोडे दिवस झाले की खेळाडू प्रशिक्षकाची तक्रार करू लागतात. मिरज यांच्या बाबतीतही त्यांचे हेच मत होते. मुळात ऑलिम्पिकमधील हॉकीची सर्वाधिक सुवर्णपदके, अशी कौतुकाची मारली जाणारी थाप आता थांबवायला हवी. सध्याच्या बदललेल्या हॉकीत आपण कुठे आहोत याचा विचार केलाच जात नाही. खेळाडूंना समजून घेणारा प्रशिक्षक हवा, पण तो या नव्या स्वरूपाशी जुळवून घेणारा आणि खेळाडूंना ते पटवून देणाराही हवा. पण तसे होत नाही. आधी परदेशी प्रशिक्षक आणायचा, त्याला पुरेसा वेळ द्यायचा नाही, कामाचे स्वातंत्र्य नाही आणि त्यात अपेक्षित निकाल न लागल्यास हकालपट्टी. पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात येणारे अपयश, बचावफळीतील कमकुवतपणा, अखेरच्या मिनिटाला गमावणारा आत्मविश्वास, हे भारतीय खेळाडूंच्या अपयशाचे कारण आहे. प्रशिक्षक कोणीही असो; पण जोपर्यंत या गोष्टींवर काम केले जाणार नाही तोपर्यंत प्रशिक्षक हकालपट्टीचे हे चक्र याआधीही सुरू होते आणि पुढेही सुरू राहील. भारतीय हॉकीची सध्याची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे अशीच आहे.
हॉकी इंडियाने चालवलेला २००९ पासून सुरू असलेला प्रशिक्षकांच्या संगीतखुर्ची या खेळावर टाकलेला दृष्टिक्षेप :
जोस ब्रासा ( मे २००९ ते नोव्हेंबर २०१०) : बीजिंग ऑलिम्पिक स्पध्रेची पात्रता मिळवण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाच्या कटू आठवणी ताज्या असताना स्पेनच्या जोस ब्रासा यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र ब्रासा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०१० च्या राष्ट्रकुल स्पध्रेत रौप्यपदक आणि आशियाई स्पध्रेत कांस्यपदक जिंकले. आशियाई स्पध्रेपर्यंत त्यांचा करार होता आणि त्यात वाढ होणे अपेक्षित होते. परंतु लंडन (२०१२) ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरल्याने त्यांचा करार संपुष्टात आणण्यात आला.
मायकेल नोब्स ( जून २०११ ते जून २०१३) : कामगिरीत सुधारणा न झाल्याने नोब्स यांची हकालपट्टीही करार पूर्ण होण्यापूर्वीच झाली. अशी हकालपट्टी होणारे ते चौथे परदेशी प्रशिक्षक ठरले. २०११ मध्ये त्यांच्याशी पाच वर्षांचा करार झाला. मात्र हॉकी इंडियासोबत त्यांचा संसार दोन र्वषही टिकला नाही. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला शेवटच्या म्हणजे १२ व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याहीपलीकडे विश्वचषक स्पध्रेची पात्रता मिळवण्यात भारत अपयशी ठरला.
टेरी वॉल्श (ऑक्टोबर २०१३ ते ऑक्टोबर २०१४) : वॉल्श यांनी भारताला आशियाई जेतेपद आणि रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवून दिली. मात्र खेळातील राजकीय हस्तक्षेपामुळे वॉल्श यांना जावे लागले. ग्लासगो राष्ट्रकुल स्पध्रेतील रौप्यपदक हे वॉल्श यांच्या कारकीर्दीत जिंकले.
पॉल व्हॅन अॅस (जानेवारी २०१५ ते जून २०१५) : हॉकी इंडियाचे प्रमुख नरेंदर बात्रा आणि अॅस यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. बात्रांचा खेळातील हस्तक्षेप अॅस यांना नको होता आणि विरोध करताच अॅस यांची उचलबांगडी झाली.
रोलँट ऑल्टमन्स (ऑगस्ट २०१५ ते सप्टेंबर २०१७) :
२०१३ मध्ये उच्च कामगिरी प्रमुख म्हणून भारतीय संघाशी जोडलेल्या ऑल्टमन्स यांची अचानक प्रशिक्षकपदी वर्णी लागली. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी असताना त्यांची प्रशिक्षकपदी नेमणूक झाली. त्यांच्या कालावधीत भारतीय संघाची कामगिरी सुधारली होती, मात्र खेळाडूंनाच कालांतराने ते नकोसे झाले.
सौजन्य – लोकप्रभा