पुरुष संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांचा आशावाद
भारतीय हॉकी संघाची गेल्या २०-२२ वर्षांमध्ये निराशाजनक कामगिरी झाली असली तरी सध्याच्या संघातील खेळाडूंचे कौशल्य लक्षात घेतले तर पुरुष हॉकीत ऑलिम्पिक पदक दूर नाही, असे भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी सांगितले.
इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास भारताने हॉकी संघाने आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवले असले तरी लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ १२व्या स्थानावर फेकला गेला होता. ओल्टमन्स हे भारतीय संघाच्या कामगिरीबाबत आशावादी आहेत. ते म्हणाले, ‘‘जर भारतीय खेळाडूंनी माझ्या नियोजनानुसार सराव केला व प्रत्यक्ष स्पर्धेत योग्य पद्धतीने खेळ केला तर भारताचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार होईल. साखळी गटातील प्रतिस्पर्धी लक्षात घेता आम्हाला उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठण्यात अडचण येणार नाही. अर्थात मी साखळी सामन्यांचाच सुरुवातीला विचार करीत आहे. उपांत्यपूर्व फेरी निश्चित झाल्यानंतर बाद फेरीतील सामन्यांबाबत नियोजन करीन. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला आपल्याला पदक मिळावे असे वाटत असते. आमचेही तेच ध्येय आहे, मात्र त्यादृष्टीने आम्हाला अद्याप भरपूर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.’’
भारताला ‘ब’ गटात गतविजेता जर्मनी, युरोपियन विजेता नेदरलॅण्ड्स, पॅन-अमेरिकन विजेता अर्जेटिना, आर्यलड व कॅनडा यांच्याशी खेळावे लागणार आहे. ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, इंग्लंड, न्यूझीलंड व स्पेन यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील पहिले चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
‘‘साखळी गटातील प्रतिस्पर्धी माझ्यासाठी नवीन नाहीत. या संघांचे जागतिक स्तरावरील मानांकन लक्षात घेता हे संघ भारतासाठी तुल्यबळ आहेत व आम्हाला त्यांच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. चांगली सुरुवात करण्यावर आमचा भर राहणार आहे,’’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘कदाचित आम्ही पी. आर. श्रीजेश या एकाच गोलरक्षकाला ऑलिम्पिकला नेऊ. सर्वसाधारणपणे प्रत्येक संघातील १६ खेळाडूंमध्ये एकच गोलरक्षक असतो व दोन राखीव खेळाडूंमध्ये एका गोलरक्षकाचा समावेश असतो.’’
‘‘संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत विश्रांती देणार आहे, मात्र आपले संघातील स्थान अटळ आहे असे त्यांनी गृहीत धरू नये. गेल्या दोन वर्षांमध्ये वरिष्ठ खेळाडूंना भरपूर स्पर्धामध्ये खेळावे लागले आहे. त्यांना शारीरिक व मानसिकदृष्टय़ा विश्रांतीची गरज आहे असे मला वाटले व त्यामुळेच मी काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. संघातील अंतिम खेळाडू व सराव शिबिरातील खेळाडू या सर्वच खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा आहे. संघातील प्रत्येक स्थानाकरिता संघर्ष अटळ आहे,’’ असे ओल्टमन्स म्हणाले.
‘‘लंडन येथे आम्ही चॅम्पियन्स चषक स्पर्धेत सहभागी होणार आहोत. त्यानंतर व्हॅलेंसिया येथे सहा देशांच्या स्पर्धेत आम्ही भाग घेणार आहोत. या स्पर्धेनंतर ऑलिम्पिकसाठी संघ निवडण्याबाबत विचार केला जाईल. सध्या २८ खेळाडूंचा राष्ट्रीय शिबिरात समावेश आहे. प्रत्येक दिवस त्यांच्या शैलीची कसोटी ठरणारा आहे. संघातील खेळाडूंमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी कशी दिसून येईल यावर मी जास्त भर देत आहे,’’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले.
आशियाई सुवर्णपदकानंतर आत्मविश्वास वाढला -रघुनाथ
२०१४च्या आशियाई स्पध्रेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघाची कामगिरी दिवसेंदिवस उल्लेखनीय होत चालली आहे, असे मत ड्रॅक-फ्लिकर व्ही. आर. रघुनाथ याने व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘आशियाई स्पध्रेतील सुवर्णपदकानंतर संघाने स्वत:वर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. येथून माघारी न फिरता कामगिरीचा आलेख सतत चढता ठेवायचा होता. २०१४ सालापूर्वी जागतिक क्रमवारीत आम्ही १२-१३ व्या क्रमांकावर होतो, परंतु आता आम्ही सातव्या स्थानावर आहोत. प्रतिस्पर्धी आम्हाला कमी लेखण्याची चूक करणार नाही.’’