Indian hockey team won bronz medal at Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने स्पेनचा २-१ असा पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. भारतीय संघाच्या या विजयासह पंजाब सरकारचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खेळाडूंना बक्षिसे जाहीर केली आहेत. भगवंत मान यांनी कांस्यपदक विजेत्या संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम जाहीर केली आहे. भारतीय संघाच्या या विजयावर कोणत्याही सरकारने केलेली ही पहिलीच घोषणा आहे.
या कांस्यपदकाच्या लढतीत भारत आणि स्पेन यांच्यात पहिल्या क्वार्टरमध्ये बरोबरी झाली होती, मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनने एक गोल नोंदवत आघाडी घेतली होती, मात्र अल्पावधीतच भारताचा कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे अचूक गोलमध्ये रुपांतर करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतरही भारतीय संघाच्या खेळाडूंनी स्पेनवरील दडपण कायम ठेवत दुसरा गोल करत २-१ अशी आघाडी घेतली. या आघाडीनंतर भारताने स्पेनला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही आणि जोपर्यंत हूटर वाजला तोपर्यंत भारताने २-१ अशी आघाडी घेत सामना जिंकला. अशा प्रकारे टीम इंडियाने ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्यपदक जिंकून मोठा पराक्रम केला आहे.
भगवंत मान यांनी सोशल मीडियावर टीम इंडियाचे अभिनंदन केले –
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक्सवर लिहिले की, ‘राज्य सरकारच्या क्रीडा धोरणानुसार आम्ही पंजाबच्या प्रत्येक कांस्यपदक विजेत्या खेळाडूला एक कोटी रुपये देऊ… चक दे इंडिया.’ त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारतीय हॉकी संघाने स्पेनचा २-१ ने पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला आहे.’
हेही वाचा – India vs Spain Hockey : भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकत ५२ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची केली पुनरावृत्ती
पंजाबमधील खेळाडूंच्या घरी दिवाळी –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने पदक जिंकल्याने खेळाडूंच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. जालंधरमध्ये हॉकीपटू सुखजित सिंगच्या कुटुंबीयांनी आनंदाने मिठाई वाटली. या विजयाच्या जल्लोषात लोक ढोल ताशांच्या तालावर नाचताना दिसले. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत सिंगचे वडील सरबजीत सिंग देखील टीम इंडियाच्या विजयाने खूप आनंदी आहे. ते म्हणाले, ‘ही देवाची कृपा आहे, मी खूप घाबरलो होतो, पण टीमने करून दाखवले.’