अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय ज्युनिअर हॉकी संघाने मलेशियावर २-१ ने मात करत युथ ऑलिम्पिक पात्रता फेरीचं विजेतेपद मिळवलं आहे. निर्धारित वेळेत सामना ४-४ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शुटआऊटवर या सामन्याचा निकाल काढण्यात आला, ज्यामध्ये भारताने २-१ अशी बाजी मारली. बँकॉक शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या विजयामुळे भारताला ऑगस्ट महिन्यात अर्जेंटिनाच्या बुईनोस आयरेस शहरात पार पडणाऱ्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. युथ ऑलिम्पीकमध्ये हॉकीची स्पर्धा ५ खेळाडूंनिशी खेळवली जाणार आहे.
सामन्यात मलेशियाच्या मोहम्मद अनुरने ११ व्या मिनीटाला गोल करत आपल्या संघाचं खातं उघडलं. मात्र या आक्रमणामुळे दडपणाखाली न येता अवघ्या एका मिनीटातचं भारताच्या राहुल कुमार राजभारने गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. यानंतर कर्णधार विवेक सागर प्रसादने गोल झळकावत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र मलेशियाकडून मोहम्मद मोहरमने गोल करुन मलेशियाला पुन्हा २-२ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर पुढच्या सत्रांत आक्रमक खेळी करत भारताने ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र मोक्याच्या क्षणी बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या क्षुल्लक चुकांच्या आधारावर मलेशियाने सामन्यात पुनरागमन करत ४-४ अशी बरोबरी साधली.
यानंतर पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतीय खेळाडूंनी मलेशियाची कडवी झुंज मोडून काढत २-१ अशी बाजी मारली. भारतीय महिलांना मात्र अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला चीनकडून १-४ असा पराभव स्विकारावा लागलाय