आठवडय़ाची मुलाखत : दीपक हुडा, भारताचा कबड्डीपटू
क्रिकेट हा भारतीयांचा धर्म असल्याचे सांगितले जात असले तरी प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी हा भारतीयांचा श्वासच झाला आहे व त्याची लोकप्रियता क्रिकेटच्या लोकप्रियतेला मागे टाकेल, असा आत्मविश्वास पुणेरी पलटण संघाचा कर्णधार दीपक हुडाने व्यक्त केला. प्रो कबड्डीच्या यंदाच्या मोसमाला २८ जुलैपासून प्रारंभ होत आहे. पुण्याच्या संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू दीपककडे सोपवण्यात आले आहे. आक्रमक व खोलवर चढाया हे दीपकचे वैशिष्टय़ आहे. पुण्याच्या संघाला आजपर्यंत या लीगमध्ये विजेतेपद मिळवता आलेले नाही. पुण्याच्या संघाची व्यूहरचना व एकंदर कबड्डीची प्रगती या बाबत दीपकशी केलेली बातचीत-
* पुण्याच्या संघाचे कर्णधारपद भूषवताना कोणते नियोजन केले आहे ?
कर्णधारपद ही टांगती तलवारच असते. सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन संघाचे ईप्सित ध्येय साकार करण्याबाबत आम्ही नियोजन केले आहे. खोलवर चढाया व अचूक पकडी करण्याबाबत माहीर असलेल्या अनेक गुणवान खेळाडूंचा आमच्या संघात समावेश आहे. तसेच अनुभवी व युवा खेळाडूंचा सुरेख समतोल आमच्याकडे आहे. सर्व खेळाडूंना त्यांच्या क्षमतेइतके शंभर टक्के कौशल्य दाखवण्याची संधी देण्यावर माझा भर राहणार आहे. शक्यतो प्रत्येक खेळाडूला यशस्वी चढाई व अचूक पकड कशी करता येईल यावरच आम्ही सराव शिबिरात लक्ष केंद्रित केले आहे.
* संघाचे प्रशिक्षक बी. सी. रमेश यांच्याशी कसा संवाद आहे?
रमेश हे अतिशय अव्वल दर्जाचे प्रशिक्षक आहेत. खेळाडू व साहाय्यक मार्गदर्शकांबरोबर त्यांचा सुरेख संवाद आहे. खेळाडूंवर विश्वास ठेवला तरच ते आपल्यावर विश्वास ठेवतात असे त्यांचे मत आहे. त्यानुसारच ते प्रशिक्षण व प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे आम्हा प्रत्येक खेळाडूला ते वडिलांच्याच स्थानी वाटत आहेत. प्रत्येक खेळाडूचे गुणदोष ओळखून त्याच्याकडून संघासाठी सर्वोत्तम कौशल्य कसे काढून घेता येईल यावर त्यांचा भर असतो. त्याचप्रमाणे शारीरिक तंदुरुस्ती व वैविध्यपूर्ण तंत्र याबाबतही त्यांचे भरपूर मार्गदर्शन मिळत आहे. अन्य संघांमधील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे व त्यादृष्टीने आमच्या संघाबाबत ते व्यूहरचना करीत आहेत.
* संघाची संख्या वाढली आहे या पाश्र्वभूमीवर विजेतेपदाची कितपत संधी आहे?
खरे तर माझ्याकडे नेतृत्व आले तेव्हाच मी विजेतेपदावर पुण्याचे नाव कोरायचे आहे हेच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. संघांची संख्या वाढली असली तरी आमच्यावर कोणतेही दडपण नाही. आमच्या संघात संदीप नरेवाल, राजेश मोंडल, उमेश म्हात्रे, गिरीश ईर्नाक, रोहितकुमार चौधरी यांच्यासारखे गुणवान खेळाडू आहेत. मी जरी कर्णधार असलो तरी मी त्यांच्यासारखाच एक खेळाडू आहे असे मानून मी त्यांच्या समवेत सुसंवाद ठेवीत असतो. शेवटच्या पाच-सहा मिनिटांमध्ये अनेक वेळा पुण्याच्या संघास पराभव स्वीकारावा लागला आहे हे मी पाहिले आहे. शेवटपर्यंत आघाडी कशी राखता येईल या दृष्टीने आम्ही नियोजन करीत आहोत.
* कबड्डीच्या लोकप्रियतेविषयी काय सांगता येईल?
आम्हा कबड्डीपटूंना सेलिबेट्रीसारखे महत्त्व येईल असे कधी वाटले नव्हते. आम्हाला भरपूर पैसा मिळू लागला आहे यात तिळमात्र शंका नाही. मात्र आमचा खेळ लवकरच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समाविष्ट होईल एवढी प्रगती प्रो लीगमुळे झाली आहे. केवळ भारतात नव्हे तर परदेशातही या लीगची लोकप्रियता वाढली आहे. बंगळूरु येथे गतवर्षी सामने सुरू असताना ज्येष्ट क्रिकेटपटू राहुल द्रविड हे मुलांसह मला भेटायला आले होते. त्यांच्या मुलांना माझी स्वाक्षरी पाहिजे होती. त्यांची मुलेही कबड्डी खेळू लागली आहेत व प्रो कबड्डी लीगमध्ये खेळण्याचे या मुलांचे स्वप्न आहे हे द्रविड यांनी स्वत: सांगितल्यानंतर मला खूपच आनंद झाला. द्रविड हे माझ्यासाठी आदर्श आहेत व तेच मला भेटायला आले हीच आमच्या लीगच्या लोकप्रियतेची पावती आहे. यंदा संघांची संख्या वाढली आहे, त्यामुळे हा खेळ खेडोपाडी पोहोचण्यास मदत होणार आहे.