आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने कोणत्या खेळाचे संघ पाठवावेत आणि कोणत्या खेळाडूंनी जावे, याचा वाद अखेरच्या टप्प्यातसुद्धा ऐरणीवर आहे. परंतु दोन हमखास सुवर्णपदकांची कमाई करून देणाऱ्या कबड्डी या खेळाबाबत मात्र कोणाचाही आक्षेप नाही. नवी दिल्लीमध्ये १९८२मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत कबड्डीचा प्रदर्शनीय सामना झाला होता. याच कालखंडात नेपाळ ते जपान या शेजारील राष्ट्रांमध्ये कबड्डीच्या प्रचार-प्रसाराचे अभियान जोरात सुरू होते. १९९०मध्ये या मेहनतीला फळ आले आणि बीजिंग आशियाई क्रीडा स्पध्रेत कबड्डी या खेळाचा समावेश करण्यात आला. भारताने अपेक्षेप्रमाणेच आपली मक्तेदारी सिद्ध करीत आतापर्यंतची ओळीने सहा सुवर्णपदके जिंकली आहेत.
मागील आशियाई क्रीडा स्पध्रेत महिलांच्या कबड्डीचाही श्रीगणेशा झाला. त्यामुळे भारताच्या सुवर्णपदकाची संख्या एकाने वाढली. पुरुष संघाचे प्रशिक्षकपद बलवान सिंग आणि जे. उदय कुमार भूषवणार आहेत, तर नीता दडवे आणि ई. भास्करन महिला संघाला मार्गदर्शन करतील.
भारताला अव्वल मानांकन
२०१०मध्ये गुवांगझाऊला झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील कामगिरीनुसार यंदा संघांना मानांकने देण्यात आली आहेत. भारताला दोन्ही विभागांमध्ये अव्वल मानांकन लाभले आहे. पुरुषांमध्ये प्राथमिक फेरीतील अ-गटात भारतासह बलाढय़ पाकिस्तान, बांगलादेश आणि थायलंड यांचा समावेश आहे. तसेच महिलांमध्ये प्राथमिक फेरीत भारतासह बांगलादेश आणि यजमान दक्षिण कोरियाचा समावेश आहे. भारताला पुरुष विभागात पाकिस्तान, बांगलादेश आणि इराणचे, तर महिलांमध्ये इराण, थायलंड आणि दक्षिण कोरियाचे प्रमुख आव्हान असेल. प्रो-कबड्डी लीगमध्ये अनेक व्यावसायिक दर्जाचे सामने खेळल्यामुळे भारतीय पुरुष संघाचा पुरेसा सराव झाला आहे, परंतु काही खेळाडूंना दुखापतींच्या समस्यांनीसुद्धा त्रस्त केले आहे. या परिस्थितीवर मात करून भारताचे दोन्ही संघ विजेतेपद जिंकून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
राकेश, जसवीर, तेजस्विनी, ममतावर मदार
कबड्डीमध्ये भारताने गेली २४ वष्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्य केले आहे. आशियाई क्रीडा स्पध्रेतील पुरुषांची सहा आणि महिलांचे एक सुवर्णपदक जसे भारताकडे आहे तसेच विश्वचषक कबड्डी स्पध्रेतही पुरुषांमध्ये भारताने २००४ आणि २००७मध्ये सुवर्णपदकाची किमया साधली आहे, तर २०१२मध्ये झालेल्या महिलांच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकातही भारताने जेतेपद प्राप्त केले होते. भारतीय पुरुष संघाची मदार असेल ती राकेश कुमार, मनजीत चिल्लर, अनुप कुमार, जसवीर सिंग आणि अजय ठाकूर या प्रो-कबड्डी गाजवणाऱ्या हुकमी शिलेदारांवर. याचप्रमाणे महिला संघाची भिस्त तेजस्विनी बाई, ममता पुजारी, कविता यांच्यावर असेल.
*भारताचा पुरुष संघ : राकेश कुमार, सुरजीत सिंग, नवनीत गौतम, अजय ठाकूर, जसवीर सिंग, अनुप कुमार, गुरप्रीत सिंग, राजगुरू, नितीन मदने, सुरजीत नरवाल, प्रवीण कुमार, मनजीत चिल्लर. प्रशिक्षक : बलवान सिंग, जे. उदय कुमार.
*भारताचा महिला संघ : तेजस्विनी बाई, ममता पुजारी, प्रियांका, अभिलाषा म्हात्रे, सुमित्रा शर्मा, जयंती, कविता, कविता देवी, अनिता मावी, किशोरी शिंदे, पूजा ठाकूर, सुष्मिता पोवार. प्रशिक्षक : नीता दडवे, ई. भास्करन.
भारताचे सामने
पुरुष विभाग
२८ सप्टेंबर    भारत वि. बांगलादेश
२९ सप्टेंबर    भारत वि. थायलंड
३० सप्टेंबर    भारत वि. पाकिस्तान
२ ऑक्टोबर    उपांत्य फेरी
३ ऑक्टोबर    अंतिम फेरी
महिला विभाग
२८ सप्टेंबर    भारत वि. बांगलादेश
३० सप्टेंबर    भारत वि. द. कोरिया
२ ऑक्टोबर    उपांत्य फेरी
३ ऑक्टोबर    अंतिम फेरी

Story img Loader