ICC World Cup 2023: ५ ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यांदरम्यान सर्व संघ तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत. तिरुवनंतपुरममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानचा पहिला सराव सामना पावसामुळे रद्द झाला. आता त्याला गुवाहाटी येथे मंगळवारी (३ ऑक्टोबर) श्रीलंकेविरुद्ध दुसरा सराव सामना खेळायचा आहे. दरम्यान, अफगाणिस्तान संघात भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाचा मार्गदर्शक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) भारताचा माजी कर्णधार अजय जडेजा याची वन डे विश्वचषकासाठी टीम मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे. अफगाणिस्तानने २०१५ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक खेळला होता. त्यांनी २०१५ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध एकच सामना खेळला आहे. २०१९च्या विश्वचषकात त्यांनी सर्व नऊ सामने गमावले. भारतीय खेळपट्ट्यांवर भक्कम फिरकी गोलंदाजीच्या जोरावर काही सामने जिंकण्याकडे अफगाणिस्तानची नजर असेल.
अजय जडेजाची कारकीर्द
अजय जडेजाने १९९२ ते २००० पर्यंत भारताकडून १५ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने २६.१८च्या सरासरीने ५७६ धावा केल्या आहेत. या काळात त्याने चार अर्धशतके झळकावली होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ९६ आहे. जडेजाने १९६ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर सहा शतके आणि ३० अर्धशतके आहेत. त्याने ३७.४७च्या सरासरीने ५३५९ धावा केल्या आहेत. जडेजाने १११ प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली आहे. या कालावधीत ८१०० धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने २९१ लिस्ट ए सामन्यांमध्ये ८३०० हून अधिक धावा केल्या आहेत.
बांगलादेशसोबत पहिला सामना खेळणार आहे
अफगाणिस्तान ७ ऑक्टोबर रोजी धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. त्याचा दुसरा सामना भारताविरुद्ध ११ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
अफगाणिस्तानचा विश्वचषक संघ
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
भारतीय संघाची विश्वचषक ट्रॉफीवर असणार नजर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ ८ ऑक्टोबरपासून चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२३च्या वनडे विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. टीम इंडिया तिसर्यांदा विश्वचषक जिंकण्याकडे लक्ष देईल. भारताने आतापर्यंत १९८३ आणि २०११ मध्ये दोन विश्वचषक जिंकले आहेत. मात्र गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेला विश्वचषकाचा दुष्काळ संपवण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल.
याबरोबरच टीम इंडिया दशकभरापासून सुरू असलेल्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचाही प्रयत्न करणार आहे. भारताने शेवटचे २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने आयसीसीचे विजेतेपद जिंकले होते. भारताने २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि अलीकडेच आठव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आणि विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकली.