Road Safety World Series : सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, विरेंद्र सेहवाग, ब्रेट ली यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू रस्ते सुरक्षा जागतिक स्पर्धेत पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत लेजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लेजंड्स या दोन संघांमध्ये ७ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारत लेजंड्सचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरसह विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, जहीर खान हे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर एकत्र खेळताना दिसणार आहेत.

क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडेल असे सामने ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज’मध्ये होणार आहेत. पहिला सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर ७ मार्च २०२० रोजी होणार आहे. तर सीरिजचा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर (सीसीआय) २२ मार्च २०२० रोजी खेळला जाईल. सर्व सामने सायंकाळी ७ वाजता सुरू होतील. कलर्स सिनेप्लेक्स, कलर्स कन्नड सिनेमा आणि दूरदर्शन या वाहिन्यांवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

असा असेल भारत लेजंड्स संघ –

सचिन तेंडुलकर (कर्णधार), विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, जहीर खान, इरफान पठाण, अजित आगरकर, संजय बांगर, मुनाफ पटेल, मोहम्मद कैफ, प्रग्यान ओझा, समीर दिघे (यष्टीरक्षक), साईराज बहुतुले

या स्पर्धेमधील एकूण ११ सामन्यांपैकी दोन सामने वानखेडे स्टेडियमवर, चार सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर, चार सामने नवी मुंबईच्या येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आणि अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल. ही ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांमधील माजी क्रिकेटपटूंमध्ये होणार आहे. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, जहीर खान, ब्रायन लारा, शिवनारायण चंदरपॉल, ब्रेट ली, ब्रॅड हॉज, जॉन्टी ऱ्होड्स, हशिम आमला, मुथय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, अजंता मेंडिस यांच्यासह अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत.

स्पर्धेचे वेळापत्रक

७ मार्च २०२० – भारत वि. वेस्ट इंडिज – वानखेडे (मुंबई)
८ मार्च २०२० – ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका – वानखेडे (मुंबई)
१० मार्च २०२० – भारत वि. श्रीलंका – डी. वाय. पाटील (नवी मुंबई)
११ मार्च २०२० – वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका – डी. वाय. पाटील (नवी मुंबई)
१३ मार्च २०२० – दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका – डी. वाय. पाटील (नवी मुंबई)
१४ मार्च २०२० – भारत वि. दक्षिण आफ्रिका – एमसीए स्टेडियम (पुणे)
१६ मार्च २०२० – ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज – एमसीए स्टेडियम (पुणे)
१७ मार्च २०२० – वेस्ट इंडिज वि. श्रीलंका – एमसीए स्टेडियम (पुणे)
१९ मार्च २०२० – ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका – डी. वाय. पाटील (नवी मुंबई)
२० मार्च २०२० – भारत वि. ऑस्ट्रेलिया – एमसीए स्टेडियम (पुणे)
२२ मार्च २०२० – अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियम (मुंबई)

Story img Loader