भारतीय खेळाडूंसाठी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये बुधवारचा दिवस निराशाजनक ठरला. पुरुष गटांत त्यांना १२व्या मानांकित क्युबाने २.५-१.५ अशा फरकाने हरविले. महिलांमध्ये सर्बियाने भारताला त्याच फरकाने पराभवाचा धक्का दिला.
परिमार्जन नेगीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या एस. पी. सेतुरामनने बलाढय़ खेळाडू लिनिआर डॉमिनेझ पेरेझला बरोबरीत रोखले. कृष्णन शशिकिरणने लाझारो ब्रुझान बाटिस्टा याच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, मात्र त्याला हा डाव बरोबरीत स्वीकारावा लागला. बी.अधिबनलाही युनिस्की क्युसेदा पेरेझ याच्याविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. शेवटच्या लढतीत भारताच्या एम. आर. ललित बाबूला रिनाल्डो ओरिट्ज सोरेझने पराभूत करीत क्युबाला विजय मिळवून दिला. या सामन्यातील पराभवामुळे भारत १२व्या स्थानावर फेकला गेला.
महिलांमध्ये भारताच्या द्रोणावली हरिकाने पहिल्या लढतीत जोवाना व्होजिनोविकवर शानदार विजय मिळविला. मात्र नंतरच्या लढतींमध्ये भारताच्या तानिया सचदेव व मेरी अॅन गोम्स यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अँजेलिजा स्टोजानोविकने तानियाला तर मारिजा रॅकिकने गोम्स हिला हरविले. त्यामुळे सर्बियाला २-१ अशी आघाडी मिळाली. शेवटच्या लढतीत पद्मिनी राऊतला अॅदेला व्हेलिकिकने बरोबरीत रोखले आणि संघाला विजय मिळवून दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा