शांघाय : भारतीय तिरंदाजांनी नव्या हंगामाची सुरुवात पदक निश्चितीने केली. नव्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारात भारतीय पुरुष, महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी ऑलिम्पिक रिकव्र्ह प्रकारात धीरज बोम्मादेवराने राष्ट्रीय विक्रमाची नोंद करताना मानांकन फेरीत तिसरा क्रमांक मिळवला.
पहिल्या टप्प्यातील या स्पर्धेत बुधवारी सुरुवात झाली. अनुभवी अभिषेक वर्मा, पदार्पण करणारा पुण्यातील पिंपरी-चिंचवडचा प्रथमेश फुगे, २१ वर्षांखालील गटातील जगज्जेता प्रियांश या पुरुष संघाला मानांकन फेरीत भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यावर भारताने प्रथम फिलिपाइन्स आणि नंतर डेन्मार्कला पराभूत केले. उपांत्य फेरीत बलाढय़ कोरियावर २३५-२३३ अशी मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत सुरुवातील दोन्ही संघ बरोबरीत होते. पण, अखेरच्या तिसऱ्या फेरीत कोरियन तिरंदाजांचा नेम चुकला आणि त्याचा फायदा उठवत भारतीयांनी अचूकता राखून ५९ गुणांची कमाई करत विजयाला गवसणी घातली. अंतिम फेरीत त्यांची गाठ आता नेदरलँड्सशी पडणार आहे.
हेही वाचा >>> VIDEO : “महागडा सलमान खान” आयपीएलदरम्यान युजवेंद्र चहलचा ‘राधे भाई’ अवतार पाहून तुम्हीही हसून व्हाल लोटपोट
स्पर्धेच्या ठिकाणी वाऱ्याचा वेग चांगला होता. वाऱ्याचा अभ्यास आमच्याकडून प्रत्येकाने चांगला केला. विशेष म्हणजे आमच्यात समन्वय चांगला होता, अशी प्रतिक्रिया अनुभवी अभिषेक वर्माने व्यक्त केली. पदार्पण करणारा प्रथमेश सध्या २१ वर्षांखालील गटात प्रियांशच्या साथीत जगज्जेता आहे. ‘‘उपांत्य फेरीचे सामने नेहमीच चुरशीचे होतात. हा सामनाही असाच चुरशीचा झाला. अचूकता राखल्याने आम्ही बलाढय़ कोरियावर मात करू शकलो,’’ असे प्रथमेश म्हणाला. ‘‘ज्या खेळाडूंचा खेळ पाहून आम्ही तिरंदाजीत कारकीर्द घडविण्याचे निश्चित केले, त्यांना हरवून अंतिम फेरी गाठली याचा आनंद होत आहे,’’ असे प्रियांशने सांगितले.
भारतीय महिला संघाला अव्वल मानांकन असून, ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परणीत कौर यांच्या अचूक कामगिरीने महिलांनी सहज अंतिम फेरी गाठली. महिला संघाने प्रथम तुर्की आणि नंतर एस्टोनियाचे आव्हान अगदी सहज पार केले. उपांत्य फेरीत एस्टोनियावर भारताने २३५-२३० असा विजय मिळवला. सुवर्णपदकासाठी भारताची गाठ इटलीशी पडणार आहे. दोन्ही अंतिम लढती शनिवारी होतील. ‘‘आम्ही आमच्या नेमबाजीत सातत्य राखले. अचूकता आणि एकाग्रता ढळणार नाही याची आम्ही काळजी घेतली,’’असे आदिती स्वामीने सांगितले. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या यशाची आम्ही पुनरावृत्ती करू असा विश्वासही आदितीने या वेळी व्यक्त केला.
बोम्मादेवराचा राष्ट्रीय विक्रम
ऑलिम्पिक रिकव्र्ह प्रकारात बोम्मादेवराने ६९३ गुणांची कमाई करताना तरुणदीप रायचा ६८९ गुणांचा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने तिसरा क्रमांक मिळवला. आता मुख्य फेरीत त्याची गाठ चेक प्रजासत्ताकच्या अॅडम लीशी पडणार आहे. तरुणदीपने ६८४ गुणांची कमाई करताना सातवे, तर प्रवीण जाधवने ६७२ गुणांची कमाई करताना २५ वे स्थान मिळवले. भारतीय संघ २०४९ गुणांसह दुसरा आला असून, दुसऱ्या फेरीत भारताला पुढे चाल आहे. महिला गटात मानांकन फेरीत फार चांगले यश मिळाले नाही. अंकिता भकत ६६४ गुणांसह २५वी आली. भजन कौर ६५७, तर एक वर्षांने पुनरागमन करताना दीपिका कुमारी ६५६ गुणांचीच कमाई करू शकले. महिला संघ १९७७ गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला.
कम्पाऊंड संघ प्रशिक्षकाविनाभारतीय कम्पाऊंड संघ येथे प्रशिक्षकाविना आला आहे. गेल्या हंगामात भारतीय संघाने इटलीहून आयात केलेले सर्गिओ पॅगनी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश संपादन केले होते. मात्र, या वेळी ते भारतात एका शिबिरात व्यग्र असल्यामुळे येऊ शकले नाहीत, असे कारण सांगण्यात आले.