Indian Men’s Cricket Team Arrives in China: सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ चीनमध्ये पोहोचला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी सकाळी मुंबईहून हांगझोला रवाना झाला होता. भारतीय संघ ३ ऑक्टोबरपासून येथे आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. चीनमध्ये पोहोचल्यानंतर रिंकू सिंगने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
बीसीसीआयने ट्विट करून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण मुंबई विमानतळावर दिसत आहेत. टी-२० क्रमवारीत चांगल्या स्थितीमुळे, भारतीय संघाला येथे जास्त सामने खेळावे लागणार नाहीत. त्यामुळे भारत केवळ उपांत्यपूर्व सामन्यातून थेट सहभागी होईल. उपांत्यपूर्व फेरीत थेट भाग घेणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचाही समावेश आहे.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात रिंकू सिंग, शिवम दुबे आणि प्रसिद्ध कृष्णा यांचाही समावेश आहे. हांगझूला पोहोचल्यावर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रासोबत भारतीय खेळाडू दिसले. केकेआरचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये रिंकूसह आवेश खान, रवी बिश्नोई, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंह यांचा समावेश आहे.
भारतीय क्रिकेट संघासह दिसला नीरज चोप्रा –
या पोस्टला कॅप्शन देत त्यांनी “राष्ट्रीय कर्तव्य” असे लिहिले आहे. भारतीय संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ३ ऑक्टोबरला होणार आहे. दुसरीकडे नीरज चोप्रा ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत आपले कौशल्य दाखवताना दिसणार आहे. गेल्या वेळी जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. यावेळीही नीरज भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ –
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभासिमरन सिंग (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, अव्वल खान आणि अर्शदीप सिंग.